
पोलिस दलात ७,०७६ उमेदवारांची निवड
केदार शिंत्रे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबई पोलिसांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आधी मैदानी त्यानंतर लेखी परीक्षेतील पात्र उमेदवारांची पडताळणी प्रक्रिया आता सुरू होणार आहे. तत्पूर्वी लेखी परीक्षेनंतर पोलिस शिपाई पदासाठी ७०७६ उमेदवारांची निवड करण्यात आली असून ८९७० उमेदवार ‘वेटिंग लिस्ट’मध्ये आहेत; तर चालक पदासाठी ९९४ उमेदवार निवडले गेले असून १४७० उमेदवार प्रतिक्षा यादीत आहेत. निवड समितीमार्फत उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर पुढील पडताळणी प्रक्रिया सुरू होईल. यात उमेदवाराची कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी, शारीरिक पडताळणी अशा प्रक्रियांचा समावेश आहे.
मुंबई पोलिस दलाच्या भरतीत शिपाई पदासाठी ७,६३,४५१ इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले होते. यापैकी प्रत्यक्ष मैदानी चाचणीमध्ये ३,६०,३०९ उमेदवारांनी सहभाग घेतला. मैदानी चाचणीतून ८३ हजार उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले. यातून ७८,५०२ विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेत सहभाग घेतला. यापैकी १२,२२१ उमेदवारांना लेखी परीक्षेत ४० पेक्षा कमी गुण प्राप्त झाल्यामुळे ते अपात्र ठरले. भरती प्रक्रियेतील नियमांप्रमाणे लेखी परीक्षेत ४० पेक्षा कमी गुण मिळाल्यास उमेदवार अपात्र ठरतो. या प्रक्रियेत अंतिमतः एकूण ७०७६ उमेदवारांना निवड सूचित स्थान मिळाले असून ८,९७० उमेदवारांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेत चालक पदासाठी १,१८,७४४ उमेदवारांनी अर्ज केला होता. यापैकी ७८,५३२ उमेदवारांनी प्रत्यक्षात मैदानी चाचणीत सहभाग घेतला. यातील ५७,४७४ उमेदवार पात्र ठरले. यातून पुढे झालेल्या कौशल्य चाचणीत १२,५५० उमेदवार पात्र ठरले. १०,३४६ उमेदवार लेखी परीक्षेनंतर पात्र ठरले. यातून ९९४ उमेदवारांना निवड सूचित स्थान मिळाले आहे; तर १४७० उमेदवार ‘वेटिंग लिस्ट’मध्ये आहेत.
पडताळणी प्रक्रिया
१) निवड समितीमार्फत उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेत सर्वप्रथम उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. या सोबतच उमेदवारांना चारित्र्य प्रमाणपत्र (कॅरेक्टर सर्टिफिकेट) द्यावे लागणार आहे.
२) उमेदवारांना स्थानिक पोलिसांकडून शेरा घेणे हा प्रक्रियेचा भाग आहे. या सर्व पडताळणी प्रक्रियेतून जे उमेदवार योग्य ठरतील, त्यांना नियुक्तिपत्र देऊन रुजू करण्यात येणार आहे. मुंबई पोलिस दलात ८००० पदांची भरती असल्यामुळे, तसेच उमेदवारांची संख्या मोठी असल्याने पडताळणीची प्रक्रिया काही महिने चालणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पोलिस भरती आता अंतिम टप्प्यात आली आहे. लेखी परीक्षेनंतर पुढे उमेदवारांची पडताळणी प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर या पडताळणीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनाच कामावर रुजू करून घेण्यात येणार आहे.
- तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त, मुंबई
--------