
‘आयएनएसव्ही तारिणी’ विशेष मोहिमेनंतर मायदेशी परतणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : गोव्यातील इंडियन नेव्हल वॉटरमॅनशिप ट्रेनिंग सेंटर येथील नौदलाचे ‘आयएनएसव्ही’ तारिणी हे जहाज २३ मे रोजी मायदेशी परतणार आहे. १७००० नॉटिकल माईल्स लांब महासागरतून आंतरखंडीय प्रवास करून सहा महिन्यांनंतर हे जहाज मायदेशी परतत आहे. यातील सहा सदस्यीय क्रू मेंबर्सचे विशेष कार्यक्रमाद्वारे स्वागत करण्यात येणार आहे.
विशेष सागरी मोहिमेचे नेतृत्व ले. कमांडर दिलना के. आणि रूपा ए. या दोन महिला अधिकाऱ्यांनी केले. इतर सहभागींमध्ये गोव्यापासून रिओ-डी-जनेरियोपर्यंत पुढच्या प्रवासाच्या पर्वात कॅप्टन अतुल सिन्हा, लेफ्टनंट कमांडर आशुतोष शर्मा आणि लेफ्टनंट अविरल केशव यांचा समावेश आहे. परतीच्या प्रवासातील क्रूमध्ये सीडीआर निखिल हेगडे, सीडीआर एमए झुल्फीकार, सीडीआर दिव्या पुरोहित आणि सीडीएसी यांचा समावेश आहे.
लेफ्टनंट कमांडर दिलना आणि रूपा यांनी गोवा ते केपटाऊनमार्गे रिओ डी जनेरियो आणि मागे प्रवास केला. या जहाजावर १८८ दिवसांहून अधिक काळ क्रू मेंबर्सने प्रवास केला. २३ मे रोजी अतिथी म्हणून केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत.