विरारमध्ये कचरा संकलन केंद्राला सुरुवात

विरारमध्ये कचरा संकलन केंद्राला सुरुवात

विरार, ता. २५ (बातमीदार) : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन - अर्बन २.०’ अंतर्गत माझे आयुष्य, माझे स्वच्छ शहर या उपक्रमातील सुका कचरा संकलन केंद्राचा शुभारंभ महापालिका आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या हस्ते सेंट्रल पार्क बोळिंज रोड प्रभाग समिती अ मध्ये झाला. ५ जून या जागतिक पर्यावरण दिनापर्यंत घरातील टाकाऊ वस्तू महिला बचत गटांमार्फत स्वीकारण्यात येणार आहेत. यामध्ये सुका कचरा वेगळा झाल्याने शहरातील कचरा कमी होणार आहे.

प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्या वापरण्यास प्रवृत्त करण्यात येणार आहे. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ उत्पादन केले जाणार आहे. यामुळे महिला बचत गटांना आर्थिक विकासाचा मार्ग उपलब्ध होणार आहे. गेल्या आठवड्यापासून यासाठी पूर्वतयारी सुरू केल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी सांगितले. या प्रकल्पातून बचत गटांच्या महिलांनी रोजगार उपलब्ध होणार आहे. महापालिकेकडून प्रत्येक प्रभाग समितीमध्ये एक आणि गोखिवरे क्षेपणभूमीत एक असे एकूण १० केंद्र प्रातिनिधीक स्वरूपात उभारण्यात येणार असल्याचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले. याप्रसंगी उपायुक्त चारुशीला पंडित, माजी सभापती सखाराम महाडिक, माजी सदस्य हार्दिक राऊत, अजित नाईक, माजी सदस्या सुरेखा कुरकुरे, सीमा काळे, सहायक आयुक्त प्रकाश जाधव, अधीक्षक दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

या वस्तू करा जमा
अल्प वापर झालेल्या, आता वापरात नसलेल्या, डागडुजी करून पुन्हा वापरता येतील अशा वस्तू या केंद्रांवर देता येतील. त्याचा अनेकांना फायदा होईल, असे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com