कालबाह्य टँकर पुन्हा रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कालबाह्य टँकर पुन्हा रस्त्यावर
कालबाह्य टँकर पुन्हा रस्त्यावर

कालबाह्य टँकर पुन्हा रस्त्यावर

sakal_logo
By

विरार, ता. २८ (बातमीदार) : वाहतुकीचे नियम डावलून वैधता संपलेली वाहने रस्त्यावर धावत आहेत. या वाहनांविरोधात कारवाई होत नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी नालासोपारा येथील बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयात टँकर घुसल्याने शहरातील जुन्या गाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात प्रदूषण करणाऱ्या जुन्या टँकरवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांबरोबर बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

टँकरवाल्यांकडून वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने शहरामध्ये अपघाताचे प्रमाण वाढत आहे. टॅंकरमधून पाणी सांडणे, वाहतुकीला नादुरुस्त टॅंकर वापरणे, टॅंकरवर क्लीनर नसणे, अप्रशिक्षित चालक, कागदपत्रांची पूर्तता न करणे अशा प्रकारे धोकादायक टॅंकर वसईत चालत आहेत. वाहनांची शारीरिक क्षमता नसताही ती वाहतुकीला वापरल्याने नागरिकांच्या जीवाला आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या विरोधात तत्कालीन आयुक्त डी. गंगाधरन यांनी वाहतूक पोलिसांना कारवाई करण्याबाबतचे पत्र दिले होते; परंतु त्यावरची कारवाई गुलदस्त्यात आहे.

टँकर व्यावसायिक नव्याने टँकर खरेदी करत नाहीत. ते इतर ठिकाणाहून जुनी वाहने खरेदी करतात. त्यामुळे त्यांची नोंद होत नाही, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे. वाहतूक पोलिस मुदत संपलेल्या वाहनावर कारवाई करतील, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पाच वर्षांत ५९ जणांचे बळी
मागील पाच वर्षांत शहरात पाण्याची वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरच्या १५० हून अधिक अपघाताची नोंद झाली आहे. या दुर्घटनांमध्ये ५९ जणांचे बळी, तर ६० हून अधिक जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. शहरात धावणाऱ्या १३६ टँकरची नोंद परिवहन विभागाकडे आहे. टाळेबंदीदरम्यान केलेल्या कारवाईत १४० हून अधिक टॅंकर कालबाह्य असल्याचे निदर्शनास आले होते.

शहरात प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी पालिकेने परिवहन विभागाला पत्र दिले आहे. शहरात वाढणाऱ्या प्रदूषणामुळे प्रदूषण महामंडळ आणि हरित लवादाला पालिकेकडून उत्तरे द्यावी लागत आहेत. म्हणूनच वाहतूक पोलिस आणि इतर संस्था बरोबर सयुक्तिक बैठक घेण्यात येणार आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई विरार महापालिका