
विसावा उद्यानाचा मृतांच्या नातलगांना आधार
उल्हासनगर, ता. २३ (बातमीदार) : वडिलांची आठवण कायमस्वरूपी राहावी, यासाठी उल्हासनगरातील एका उद्योगपतीने त्यांच्या स्मरणार्थ शासकीय रुग्णालयात मृतकांच्या पोस्टमार्टेमसाठी येणाऱ्या नातलगांकरता विसावा उद्यान तयार केले आहे. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
रेल्वे, रस्ते अपघात, जळीत प्रकरण, नदीत बुडून मृत्यू, गळफास, अकस्मात मृत्यू झाल्यावर पोलिसांकडून मृत व्यक्तीचे शव विच्छेदन करण्यासाठी उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात येते. तिथे नातलग, मित्रमंडळी लांबून अथवा ग्रामीण भागातून येतात. त्यांना उन्हातान्हात, पावसाळ्यात, रात्रीच्या वेळी जिथे जागा मिळेल तिथे ताटकळत बसावे लागत होते. ही वस्तुस्थिती पाहता उद्योगपती दिनेश आहुजा यांनी दिवंगत वडील प्रकाश आहुजा यांच्या स्मरणार्थ तेथे येणाऱ्या मृत व्यक्तींच्या नातलगांसाठी विसावा-उद्यान तयार करण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांच्याशी समन्वय साधला. डॉ. बनसोडे यांनी सहकार्य करण्याची हमी दिली. त्यानुसार अल्पावधीतच १० लाकडी बाकडे, पंख्याची व्यवस्था असलेले मोठे शेड उभारून विसावा-उद्यान तयार केले. यासाठी त्यांची पत्नी वर्षा आहुजा यांनी पाठबळ दिले. या वेळी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड, शहरप्रमुख राजेंद्रसिंग भुल्लर महाराज, उपशहरप्रमुख कलवंतसिंग (बिट्टू) सोहता, अंकुश म्हस्के, तिरुपती रेड्डी, शिवसेना महिला आघाडीच्या उपशहर संघटक स्मिता चिकलकर, राखी जाधव, संजिवनी परब, सुरेखा माळोदे, सुरेखा मोरे, नीता आहुजा, रमेश आहुजा, महेश आहुजा, सीमा आहुजा, शशिकांत दायमा आदी उपस्थित होते.