
गिरणी कामगारांच्या घरांचे स्वप्न अधुरेच
वडाळा, ता. २३ (बातमीदार) ः गिरणी कामगारांसाठी म्हाडाद्वारे बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेतील सोडतीत घरे लागून प्रतीक्षेत असलेल्या कामगारांचे निधन झाल्याने, त्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे; अशी खंत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी व्यक्त केली. गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावरील प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी मजदूर मंझीलमध्ये नुकतीच एक बैठक पार पडली.
या वेळी माहिती देताना राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी सांगितले की, सोडतीत घरे लागलेले बॉम्बे डाइंग मिलमधील भिकाजी मसगे, सखाराम शंकर दरेकर, भैरू शिंदे, दिलीप शिंदे, सुधीर वाडेकर, अनिल म्हसकर आदींचे अलिकडेच निधन झाले आहे. यापेक्षाही मृतांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. सदस्य कामगार दिवंगत झाले असले, तरी त्यांच्या वारसाला कायद्याने घराचा हक्क मिळू शकतो; परंतु कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी जाणार असल्याने सध्या तरी हा प्रश्न लांबणीवर पडून घरांचे स्वप्न तूर्तास अधुरे राहिले आहे.
आमदार सचिन अहिर यांनी सांगितले की, लवकरच या प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात येईल. घरांचा ताबा मिळण्याबाबत अनंत अडचणी आल्याने तो प्रश्न अकारण लांबत गेला आहे; परंतु घर मिळण्यापूर्वी कामगार स्वर्गवासी झाल्याने त्या घरात राहण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.
संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले की, घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली असली, तरी समोर कोणताही कालबद्ध कार्यक्रम न ठेवल्याने अनेकविध समस्यांबाबत प्रश्न उभा राहिला आहे. या समितीवर सत्ताधारी पक्षाबरोबर सचिन अहिर यांच्यासारख्या अभ्यासू आणि गृहनिर्माण राज्यमंत्रीपद भुषविलेल्या नेत्यांना घेतले असते, तर एकूण घरांच्या प्रश्न सोडवणुकीला गती मिळाली असती. गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर राज्याच्या अलिकडच्या अधिवेशनात विरोधी पक्षाच्या आमदारांनी अनेक प्रश्न उपस्थित करून एक प्रकारे या प्रश्नाला चालना दिली आहे, असेही मोहिते यांनी सांगितले.
२०२० मध्ये सोडत
मुंबईतील बॉम्बे डाइंग स्प्रिंग २ हजार ६३०, टेक्स्टाइल ७२० आणि श्रीनिवास ५४४ अशा एकूण ३ हजार ८९४ घरांची १ मार्च २०२० मध्ये सोडत काढण्यात आली; परंतु अद्याप एकाही कामगाराला गृहनिर्माण मंडळाकडून ताबा मिळालेला नाही. विशेष म्हणजे काही कामगारांनी घराची संपूर्ण रक्कम भरली आहे; तर काहींनी १० टक्के रक्कम भरली असून ते कर्जाच्या प्रक्रियेत आहेत. अनेक कामगारांचे अर्ज तपासण्यात न आल्याने, त्या संदर्भातील पत्रव्यवहार म्हाडा कार्यालयाकडून अद्याप झालेला नाही. दरम्यान त्यांचे निधन झाले आहे. याकडे बजरंग चव्हाण यांनी लक्ष वेधले आहे.