कंटेनर-रिक्षाचा भीषण अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंटेनर-रिक्षाचा भीषण अपघात
कंटेनर-रिक्षाचा भीषण अपघात

कंटेनर-रिक्षाचा भीषण अपघात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. २२ : कल्याण येथील आई तिसाई देवी पुलाजवळ सोमवारी सकाळच्या वेळेस कंटेनर आणि दोन रिक्षांची धडक होत अपघात घडला. या अपघातात रिक्षांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून दोघे रिक्षाचालक जखमी झाले आहेत. बिघाड झालेला कंटेनर बाजूला घेण्यात येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षांची त्याला धडक बसल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कल्याण-शीळ रस्त्यावरून अवजड वाहनांना बंदी असतानाही बिनदिक्कत वाहतूक सुरू असते.
कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी दिशेकडून उड्डाण पूलमार्गे कंटेनर येत असताना पहाटे २ ते ३ च्या सुमारास कंटेनरमध्ये बिघाड झाला होता. या ठिकाणी मोठी वाहने उभी करण्यास जागा नसल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी कंटेनर चालकाला ट्रेलर बाजूला घेण्यास सांगितले. कंटेनरने यूटर्न मारून बाजूला जाण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान दोन रिक्षा भरधाव येत असल्याने त्या सरळ कंटेनरवर जाऊन धडकल्या. यात रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. रिक्षाचालक अमजद शेख आणि अकबर हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी दिली. किरकोळ जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

---------------
आमदार राजू पाटील यांचे ट्विट
अपघात घडल्यानंतर कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा ट्विट करत आरटीओ, वाहतूक पोलिसांचे याकडे लक्ष वेधू केले आहे. आमदार पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये, ‘अवजड वाहनांना कल्याण-शीळ मार्गावर प्रतिबंध असतानाही चिरीमिरी घेऊन सर्रास प्रवेश दिला जात आहे. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नेमलेल्या वॉर्डनच्या माध्यमातून वसुली केली जात आहे. आज सकाळी पत्रीपूल येथे अशाच एका अवजड वाहनाने दोन रिक्षांना धडक मारली. आता तरी प्रशासनाने लक्ष द्यावे...’ असे म्हटले आहे.