श्री स्वामी समर्थांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन

श्री स्वामी समर्थांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन

विरार, ता. २२ (बातमीदार) : वसईत श्री स्वामी समर्थांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन वसई पश्‍चिम येथील जानकी टॉकीजजवळील सुक्रुतींद्र कला मंदिरात २७ व २८ मे रोजी सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत राहणार आहे. याचा सर्व श्री स्वामीभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
वसईजवळच्या निर्मळ गावात आद्य शंकराचार्य परंपरेतील पाचवे शंकराचार्य विद्यारण्यस्वामी यांची समाधी आहे. तेथील प्रसिद्ध यात्रेसमयी श्रीस्वामी समर्थ प्रकटले. त्यावेळी मूळ उमराळे गावात राहणारे मोरेश्र्वर जोशी तथा शिष्य मयुरानंद स्वामींना त्यांनी ‘चंद्रशेखर बाण’ प्रसादरूपे दिला. हा शिवबाण व स्वामींनी त्यांना दिलेल्या दोन पादुका व गणपती बाप्पांच्या फोटोंचे दर्शनही प्रदर्शनात होणार आहे. लेखक, प्रकाशक संजय नारायण वेंगुर्लेकर हे गेली २७ वर्षे श्रीस्वामींच्या अस्सल छायाचित्रांचे आणि त्याविषयीच्या ग्रंथांचे, संदर्भाचे संकलन करण्याचे काम अथकपणे करत आहेत. वसईतील अनेक ज्ञात-अज्ञात स्वामीभक्त व पारनाक्यावरील ‘श्री चरण स्पर्श’ आयुर्वेदिक पद-मसाज सेवा केंद्र यांच्यातर्फे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यासाठी प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रूपश्री संजय नारंगीकर, डॉ. हेमकांत जोशी, राम जोशी यांनी केले आहे.

काय पाहायला मिळणार
श्रीस्वामी समर्थांनी अशा विविध लीलांद्वारे १५० वर्षांपूर्वी महद्कार्य केले. अशा असंख्य लीलांना साकारणाऱ्या १२५ हून अधिक दुर्मीळ छायाचित्रांचा संग्रह मुंबईचे संजय वेंगुर्लेकर यांनी साकारला आहे. त्यात श्रीस्वामींचे १४ अस्सल फोटो, स्वामींचे अक्कलकोटचे अष्टविनायक व ११ मारुती, श्रींचे ३५ प्रमुख शिष्य आणि स्वामींच्या दिव्यस्पर्शित असंख्य वस्तूंचे, २५ पादुकांचे, लीलास्थळांचे फोटो दर्शनार्थ मांडण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com