
ठाण्यात ७४ इमारती अतिधोकादायक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : पावसाळ्यात धोकादायक व अतिधोकादायक इमारतींच्या होणाऱ्या पडझडीचा अनुभव गाठीशी असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून दरवर्षी धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येत असते. त्यात ठाणे पालिका क्षेत्रात ७४ अतिधोकादायक इमारती असून त्यापैकी नौपाडा-कोपरी प्रभाग समितीअंतर्गत सर्वाधिक ४५ इमारतींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे शहरात पावसाळ्याच्या काळात इमारत पडण्याच्या घटना घडत असतात. या दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचे जीव जात असतात. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक व अतिधोकादायक इमारतीतील कुटुंबीयांना इतरत्र तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात येत असते. त्यानुसार यंदाच्या वर्षीदेखील पालिका प्रशासनाने पावसाळ्यात इमारत दुर्घटना होऊन नागरिकांचे बळी जाऊ नये यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेने शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. त्यामध्ये ७४ इमारत अतिधोकादायक असल्याची बाब समोर आली आहे. त्यापैकी पालिका प्रशासनाने २२ इमारती रिक्त करून निष्कासित करण्यात आल्या आहेत. २५ इमारती रिक्त करण्यात आल्या असून अद्याप निष्कासित करण्यात आल्या नसल्याचेदेखील पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
-----------------
नौपाडा कोपरीत सर्वाधिक धोकादायक
ठाणे पालिका क्षेत्रात ७४ अतिधोकादायक इमारती असून यामध्ये सर्वाधिक नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत ४५ इमारती आहेत. त्यातील १३ इमारती रिक्त करून निष्कासित करण्यात आल्या आहेत. १७ इमारती रिक्त करण्यात आल्या असून अद्याप निष्कासित करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. तसेच १५ इमारतींमध्ये नागरिक जीव मुठीत घेऊन राहत असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे वागळे प्रभाग समितीत एकही इमारती धोकादायक नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
...............................
अतिधोकादायक २७ इमारतीत वास्तव्य
पावसाळ्याच्या काळात पालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारती कोसळून जीवित हानी होवू नये, याकरिता पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. तसेच या अतिधोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करून इमारती रिक्त करण्याच्या सूचनादेखील करण्यात येत आहे. असे असले तरी, अजूनही २७ अतिधोकादायक इमारतींमध्ये नागरिक आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत असल्याची माहिती आकडेवारीवरून समोर आली आहे.
..............................
प्रभाग समिती-इमारती-निष्कासित इमारती-रिक्त पण निष्कासित नाही-इमारतीतील वास्तव्य
नौपाडा - कोपरी-४५-१३-१७-१५
वागळे-०० -०० -०० -००
सावरकर नगर-०६-००- ०६ - ००
वर्तक नगर-०१- ०१ - ०० - ००
माजिवाडा - ०२ -०१ - ०० - ०१
उथळसर- ०५ - ०३ - ०० - ०२
कळवा -०५ - ०२ - ०० - ०३
मुंब्रा -०४ - ०२ - ०२ - ००
दिवा - ०६ - ०० - ०० - ०६