मात्र प्रसिद्धी माध्यमांशी न बोलण्याचे आदेश

मात्र प्रसिद्धी माध्यमांशी न बोलण्याचे आदेश

मुंबई, ता. २२ : दोन वर्षांपूर्वीच्या अमली पदार्थ प्रकरणात आरोप करण्यात आलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना दिलेल्या अटकेपासूनच्या संरक्षणात मुंबई उच्च न्यायालयाने आज ८ जूनपर्यंत वाढ केली. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुपरस्टार शाहरूख खानसोबतचे व्हॉटस्ॲप चॅट माध्यमांमध्ये प्रसिद्ध केल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आणि मीडिया ट्रायल करू नका, असे त्यांना सुनावले.

शाहरूखचा मुलगा आर्यनला वानखेडे यांनी २०२१ मध्ये कॉर्डिलिया जहाज प्रकरणात अटक केली होती. आर्यनवर अमली पदार्थ बाळगल्याचा आरोप एनसीबीने ठेवला होता. आता या प्रकरणात वेगवेगळ्या घडामोडी घडत असून वानखेडे यांच्यावरच एनसीबीने आरोप केले आहेत. आर्यनला जाणीवपूर्वक अडकवण्यात आले आहे आणि त्याच्यासह अन्य काही जणांकडून वानखेडे यांनी २५ कोटींची लाच मागितली, असा आरोप करण्यात आला आहे. एनसीबीच्या तक्रारीवरून सीबीआयने त्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अटक होण्याच्या शक्यतेने वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. सुट्टीकालीन न्यायालयात न्या. अभय आहुजा आणि न्या. एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर आज सुनावणी झाली.

सरकारी नियमांचा भंग!
शाहरूख खान आणि समीर वानखेडे यांच्यामधील दोन वर्षांपूर्वीचे आर्यनच्या अटकेदरम्यानचे व्हॉटस्ॲप चॅट दोन दिवसांपासून प्रसिद्धी माध्यमातून उघड झाले आहेत. त्याबाबत आज सीबीआयच्या वतीने ॲड. कुलदीप पाटील यांनी आक्षेप घेतला. या प्रकरणात तपास सुरू आहे आणि वानखेडे काही महत्त्वाची माहिती देत नाहीत, असे पाटील म्हणाले. शाहरूखचे चॅट जाहीर करणे सरकारी नियमांचा भंग आहे आणि वानखेडे यांना अधिक दिलासा देऊ नये, असा युक्तिवाद त्यांनी केला. न्यायालयाने त्यावर वानखेडे यांना, कोणतेही व्हॉटस्ॲप चॅट खुले करू नये, त्याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी बोलू नये, तपासात सहकार्य करावे आणि पुराव्यांमध्ये छेडछाड करू नये, असे आदेश दिले. सीबीआयने ३ जूनपर्यंत याचिकेवर भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.

चॅटचा वापर केला!
सीबीआयने जरी लाचखोरीचे आरोप केले असले तरी शाहरूख खानने माझ्या कामाच्या निष्ठेचे कौतुक केले आहे, असा दावा समीर वानखेडे यांच्या वतीने करण्यात आला. त्यासंबंधी असलेले चॅट त्यांच्याकडून न्यायालयात दाखल करण्यात आले. संबंधित चॅट याचिकेत आहेत आणि आम्ही ते प्रसिद्ध केले नाही, असा खुलासा त्यांचे वकील आबाद पोंडा यांनी केला. संबंधित चॅट आर्यन अटकेत असताना केलेले आहेत. वडील म्हणून असलेल्या मुलाच्या काळजीतून शाहरूखने विनंतीदाखल केलेले चॅट वानखेडे यांनी स्वतःच्या चारित्र्याचे प्रमाणपत्र म्हणून वापरले, असा आरोपही करण्यत आला.


वानखेडेंना सीबीआयकडून पुन्हा समन्स
बुधवारी पुन्हा होणार चौकशी
मुंबई, ता. २२ : आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. वानखेेडेंची सीबीआयकडून २४ मे रोजी पुन्हा चौकशी होणार आहे. दिल्ली सीबीआय अधिकाऱ्यांची टीम मुंबईतील बीकेसी कार्यालयात चौकशी करणार आहे. सीबीआयला ३ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले. त्यानंतर पाच दिवसांनी, म्हणजेच ८ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करत दोन दिवस सीबीआय अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीला सहकार्य केल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे. दोन दिवसांतील चौकशीचा अहवालही सीबीआयने आज न्यायालयात सादर केला. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर वानखेडेंना अटकेपासून असलेले संरक्षण ८ जूनपर्यंत कायम ठेवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com