
कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू
मनोर, ता. २२ (बातमीदार) : दुचाकीला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला; तर मागे बसलेल्या एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नरेंद्र बारी (वय ४५) व रुपेश बारी (वय ३४) अशी मृत दुचाकीस्वारांची नावे आहेत. दोघेही नवापूर गावचे रहिवासी होते. नवापूर रस्त्यावरील पाम गावच्या हद्दीत मेहेर नाका भागात रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. एकाच गावातील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने नवापूर गावावर शोककळा पसरली आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये अनु फार्मा कंपनीत काम करणारा नरेंद्र बारी व जी. एम. सिंथेटिकमध्ये काम करणारा रुपेश बारी हे दोघेही एकाच दुचाकीवरून रविवारी रात्री कामावरून घरी परतत असताना अपघात झाला होता. याचवेळी एका भरधाव कारने त्यांना धडक दिल्याने अपघातात नरेंद्र बारी यांचा जागीच मृत्यू झाला; तर गंभीर जखमी झालेल्या रुपेश बारी याचा तुंगा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारचालक मद्यपान करून कार चालवत असल्याचा आरोप नवापूरच्या ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचालक ओमकार पाटील आणि आशुतोष कनेरी (दोघेही रा. बोईसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या दोघांना पालघरच्या न्यायालयात हजर केले असता गुरुवार (ता. २५) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.