एसआरटी तंत्रज्ञान राज्य शासनही आत्मसात करणार

एसआरटी तंत्रज्ञान राज्य शासनही आत्मसात करणार

नेरळ, ता. २२ (बातमीदार) : एसआरटी हे अत्याधुनिक शेतीचे तंत्रज्ञान असून हे तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. ही निश्चितच चांगली गोष्ट असून बदलाची नांदी आहे. हे शासन शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेत असून शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध आहे. कृषीभूषण शेतकरी व एसआरटीचे प्रणेते चंद्रशेखर भडसावळे त्यांच्या संपूर्ण टीमने एसआरटी तंत्रज्ञान हे थायलंड, जपान याठिकाणी पोहचवले आहे. एसआरटी तंत्रज्ञान राज्य शासनाने आत्मसात करावे यासाठी प्रयत्न करणार असून राज्यातील शेतकऱ्यांना चांगल्या पिकासाठी याचा निश्चित फायदा होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नेरळ मालेगाव येथील एसआरटी शेतकरी कृषी सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
नेरळ येथील सगुणा बाग हे केवळ कृषी पर्यटन केंद्र नाही, तर शेतकऱ्यांसाठी कायम विद्यापीठ राहिले आहे. शेतकऱ्यांसाठी नवेनवे प्रयोग सगुणा बागचे सर्वेसर्वा कृषीभूषण शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी केले आहेत. याच सगुणा बागेत सोमवारी (ता. २२) एसआरटी शेतकरी कृषी सन्मान सोहळा व परिसंवाद २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विशेष आमंत्रित म्हणून उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे, देवगिरी कल्याण आश्रम बारीपाडा, धुळेचे प्रांत अध्यक्ष चैतराम पवार, आमदार महेंद्र थोरवे, भरत गोगावले, कृषीरत्न शेतकरी सगुणा बाग चंद्रशेखर (दादा) भडसावळे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालक परिमल सिंग, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, दहिवली तर्फे वारेदीच्या सरपंच मेघा अमर मिसाळ, कोल्हारेचे सरपंच महेश विरले, नेरळचे सरपंच उषा पारधी आदी मान्यवर उपस्थित होते.

------------
५२ शेतकऱ्यांचा सन्मान
सन २०११ रोजी संशोधन केलेल्या एसआरटी म्हणजेच सगुणा रिजनरेटिव्ह तंत्रज्ञानाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कष्ट व खर्च कमी करुन उत्पादनात कमालीची वाढ केली आहे. शेतकऱ्यांना फायदेशीर ठरलेल्या एसआरटी तंत्रज्ञानाचा सन्मान सोहळा सोमवारी सगुणा बाग, मालेगाव नेरळ येथे शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी तब्बल ५२ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी नेरळ मालेगाव येथील सगुणा बाग येथे दाखल झाले होते.

------------
भूमातेच्या चित्राचे अनावरण
मुख्यमंत्री व विशेष पाहुण्यांच्या हस्ते भूमातेच्या चित्राचे अनावरण करण्यात आले. देशातील प्रथम असलेल्या भूमातेच्या चित्राची संकल्पना शेतकरी अनिल निवळकर यांची असून राकेश देवरुखकर यांनी आपल्या कुंचल्याने ती चित्रात उतरवली आहे. यानंतर मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सगुणा फाऊंडेशन डॉट एनजीओ या वेबसाईटचे प्रतिकात्मक उद्‍घाटन करण्यात आले. तसेच पोकरा प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय कोळेकर, एसआरटी शेतकरी परशुराम आगिवले, अनिल निवळकर, चित्रकार राकेश देवरुखकर यांचा सन्मान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com