निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार
निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : ठाणे महापलिका क्षेत्रात रस्त्यांची व नाले सफाईची कामे सुरू आहेत. या कामांच्या जबाबदाऱ्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जे अधिकरी त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या पार पडतील, त्यांचा सन्मान करण्यात येईल. तसेच जे अधिकारी कामात निष्काळजीपणा करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ठाणे महापलिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्त्यांची कामे आणि पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाई कामांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (ता. २२) घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्याला पोखरण रोड नं २ या ठिकाणावरून सुरुवात झाली. या वेळी याच मार्गावरील रखडलेल्या कामाबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत, रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आयआयटीलादेखील रस्त्यांचे सॅम्पल पाठवले जातील. रस्त्यांच्या कामांचे थर्ड पार्टी ऑडिटदेखील केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. तसेच महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी रस्त्यावर खड्डा पडल्यास एका खड्ड्याला एक लाख दंड वसूल करणार असल्याचे जाहीर केले आहे.


.........................
नाल्यात झुकलेल्या जेसीबीचे विघ्न
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नालेसफाईचा दौरा वर्तकनगर, भीमनगर येथून सुरू होणार होता. मात्र त्या नाल्यात साफसफाईसाठी उतरवलेला जेसीबी एका बाजूला झुकल्याने त्या दौऱ्याला विघ्नाची किनार लागल्याचे पाहण्यास मिळाले. तसेच नालेसफाई करणारे कामगार सुरक्षा साहित्याविना सफाई करताना दिसून आले. त्यामुळे नालेसफाई दौरा सुरू होण्यापूर्वीच सुरुवातीच्या ठिकाणाला रेड सिग्नल लागला. तो दौरा पोखरण रोड नंबर २ येथील हनुमान मंदिरापासून सुरू झाला. त्यामुळे ठाणे शहरातील मुख्यमंत्र्यांचा नालेसफाईचा दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. तर विना सुरक्षा साहित्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ही ऐरणीवर आला आहे.

..........................
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवल्यास गरीबांचे भले होईल असे वक्तव्य केले होते. यावर उत्तर देताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही काम करत आहोत. त्यामुळेच ठाण्यात सुरू असलेल्या नाले व रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यासाठी आलोय. गरिबांची आणि सर्वसामान्यांची जाण आम्हाला आहे. तसेच सर्वसामान्य माणसाला सुलभ व चांगल्या दर्जाची घरे क्लस्टरच्या माध्यामतून मिळतील याची काळजी सरकार घेईल, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

..................................
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत त्रुटी
ठाणे शहरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी करत असताना टिकूजीनीवाडी सर्कल येथे सुरू असलेल्या रस्ताच्या डांबरीकरण कामाची पाहणी करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले. या वेळी या कंत्राटदाराने कामगारांना कोणतीही सुरक्षा साधने, हॅन्ड ग्लोव्हज, हॅल्मेट इत्यादी दिलेली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी याची तातडीने दखल घेऊन कंत्राटदारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. कंत्राटदाराला तात्काळ ही सामुग्री देण्याबाबत खडसावले तसेच त्यांच्यावर याबाबत कारवाई करण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांना दिले.

----------------