वक्फ संस्थांचाही अर्थसंकल्प सादर होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वक्फ संस्थांचाही अर्थसंकल्प सादर होणार
वक्फ संस्थांचाही अर्थसंकल्प सादर होणार

वक्फ संस्थांचाही अर्थसंकल्प सादर होणार

sakal_logo
By

रोहा, ता. २३ (बातमीदार) : वक्फ धार्मिक स्थळे आणि संस्था विश्वस्तांना आता वक्फ मंडळाला आता वार्षिक अर्थसंकल्प द्यावा लागणार आहे. कोकणातील तीन हजार संस्थांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहे. नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांत अर्थसंकल्प सादर करण्याच्या सूचना पत्रात दिल्या आहेत. याशिवाय वक्फ मिळकती भाडे तत्त्वावर देण्यासंदर्भातील नियमावलीही वक्फ मंडळाकडून तयार करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र आणि नोटीस वक्फ धार्मिक स्थळे आणि संस्था विश्वास्तांना पाठवण्यात आल्या आहेत.
राज्यातील मशीद, मदरसा, दरगाह या वक्फ धार्मिक संस्थांच्या देखभाल व व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने १९९५ मध्ये महाराष्ट्र वक्फ ऑफ बोर्डची स्थापना केली आहे. त्‍या अनुषंगाने संस्थेच्या मशीद, मदरसा, दरगाह यांची नोंद औरंगाबाद येथील मुख्य वक्फ ऑफ बोर्ड या कार्यालयात करणे गरजेचे आहे. पूर्वी जिल्ह्यातील अलिबाग येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात यासंदर्भातील कामकाज चालायचे. आता औरंगाबाद येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे. आता याच वक्फ बोर्डाला धार्मिक स्थळे आणि संस्था विश्वस्तांना वार्षिक अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे. यासाठी कोकणातील तीन हजार संस्थांना नोटिसा पाठवल्या आहेत. धार्मिक स्थळासह अन्य वक्फ संस्थांना वर्षभरात करण्यात येणारे विविध कामे, देखभाल दुरुस्ती धार्मिक कार्यक्रमांना येणारा खर्च या सर्व प्रकारच्या खर्चा संदर्भात वार्षिक नियोजन करावे लागणार आहे. नियोजनासाठी येणारा खर्च लक्षात घेता नवीन वर्षापूर्वी त्याचा अर्थसंकल्प तयार करून मंडळास सादर करावा लागणार आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प ३० दिवसांत सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे उपकार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद यांनी दिले आहेत.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील सहा जिल्ह्यांतील विविध संस्थांना तीन हजार नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्या वक्फ संस्थांनी महाराष्ट्र राज्य वक्फ ऑफ बोर्ड औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयात सर्व कागदपत्रे जमा करून संबंधित प्रशासनाला सहकार्य करावे.
- अतिक खान, कोकण विभागीय अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ ऑफ बोर्ड