दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

राज्य प्रागतिक पक्षाची बैठक
धारावी (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य प्रागतिक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात नुकतीच पार पडली. बैठकीत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनावेळी राज्यातील गायरानधारक, बळजबरीने विविध प्रकल्पांसाठी भूमी अधिग्रहण, वाढते जातीय अंत्याचार, धार्मिक श्रद्धेचा व धार्मिक स्वातंत्र्यावर सनातन्यांचा वाढता हस्तक्षेप व आणखी काही महत्त्वाच्या प्रश्नावर प्रचंड मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. कोणताही राजकीय निर्णय सामुहिक पध्दतीने व एकमताने घेऊन अंमलबजावणी केली जाण्याचे एकमुखाने ठरले. प्रत्येक पक्षाचे एक प्रमुख यांची समिती तयार करावी आदी निर्णय या वेळी घेण्यात आले आहेत. या वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते राज्य सचिव मंडळाचे सदस्य कॉ. प्रकाश रेड्डी, ॲड सुभाष लांडे, मिलिंद रानडे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, प्रा. एस व्ही जाधव, राजू कोरडे, श्रमिक मुक्ति दलाचे डॉ. भारत पाटनकर, माकपचे कॉ. शैलेंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

खडकवाडी चॅम्पियन संघाने जिंकला चषक
घाटकोपर (बातमीदार) ः कांगोरीगड क्रिकेट क्लबच्या वतीने रविवारी नेरूळ येथील रामलीला मैदानात आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत खडकवाडी चॅम्पियन संघाने बाजी मारली. अंतिम सामना शिवशंभो आडावले आणि खडकवाडी चॅम्पियन या संघात झाला. यावेळी शिवशंभो संघाने प्रथम फलंदाजी करत दोन षटकांमध्ये ३४ धावसंख्या उभारली. तर उत्तरादाखल उतरलेल्या खडकवाडी संघाच्या राहुल काशितकरने ३४ व अमोल शेडगेने तीन धावा फटकावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. राहुल काशितकर हा विजयाचा शिल्पकार ठरला. या वेळी चॅम्पियन संघाला ११,१११ आणि चषक व द्वितीय संघाला ७,७७७ आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. कांगोरीगड क्रिकेट क्लब आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धेत एकूण १६ क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती कांगोरीगड क्रिकेट क्लबचे सल्लागार संभाजी पार्टे, विकास उतेकर यांनी दिली.

अनधिकृत जाहिरातींवर कारवाईची मागणी
मालाड (बातमीदार) ः पालिका अनधिकृत जाहिरातींवर कारवाई कधी करणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. मालाडसह संपूर्ण मुंबई परिसरात कागदी पोस्टर, फ्लेक्स तसेच स्टिकरच्या माध्यमातून अनधिकृतरित्‍या जाहिराती केल्‍या जात आहेत. बस थांबे, सार्वजनिक स्‍वच्छागृह, रस्‍त्‍यांवरील इलेक्ट्रिक बॉक्स, अशा विविणी या जाहिराती चिटकवल्‍या जातात. यामुळे परिसराचे सौंदर्य विघडत्‍ असल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे. तसेच या जाहिरातींसाठी पालिकेकडे शुल्‍कही भरले जात नसल्‍याने त्‍याचा महसूलही मिळत नाही. त्‍यामुळे अशा जाहिराती करणार्‌यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पदपथावर अनधिकृत फेरीवाले
चेंबूर (बातमीदार) ः चेंबूर येथील सायन-पनवेल महामार्गावरील एनजी आचार्य उद्यान जवळील पदपथावर अनधिकृत फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. यामुळे येथून प्रवास चालणे नागरिकांना अवघड झाले आहे. चेंबूर परिसरात एन. जी. आचार्य उद्यान महत्‍वाचे ठिकाण आहे. येथे कुर्ला, माहुल, ट्रॉम्बे, अमर महल, टिळक नगर, मानखुर्द, गोवंडी व शिवाजी नगर परिसराती नागरिक व लहान मुले व्यायाम व खेळण्याकरिता मोठ्या प्रमाणात येतात. मात्र या उद्यानाच्या परिसरात पदपथावर अनधिकृत फेरीवाले, फळ विक्रेते यांनी बस्तान मांडले आहे. या फेरीवाल्यांवर पालिका कोणतीही कारवाई करीत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पालिकेने त्‍वरीत येथील अनधिकृत फेरीवाल्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सरस्वती संघाची दुहेरी बाजी
वडाळा (बातमीदार) ः दादर येथील श्री समर्थ व्यायाम मंदिराच्यावतीने आयोजित पुरुष-महिला जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत सरस्वती संघाने दुहेरी बाजी मारत अजिंक्यपद मिळवले. यात महिला गटाच्या अंतिम सामन्यात सरस्वती कन्या संघाने ६-७ असा १ गुण व तब्बल ७ मिनिटे राखून शिवनेरी सेवा मंडळावर विजय मिळवला. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने १०-८ असा ८.१० मि. राखून अमरहिंद मंडळावर दणदणीत विजय मिळवला. तृतीय क्रमांकाच्या सामन्यात पुरुषांमध्ये श्री समर्थने ओम समर्थला तर महिलांमध्ये अमरहिंदने ओम साईश्वरला पराभूत केले. महिलांच्या गटातील अखेरच्या सामन्यात सरस्वतीच्या सेजल यादव ४.२०, ३ मि. संरक्षण व १ गुण, खुशबू सुतार २.१०, २.३० मि. संरक्षण व १ गुण व नम्रता यादव ३.१० मि. संरक्षण यांनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर अजिंक्यपद खेचून आणले.

गणेश मंदिराचा लोकार्पण सोहळा
चेंबूर (बातमीदार) ः कुर्ला येथील मा. बाळासाहेब ठाकरे नगर, म्हाडा वसाहत येथे संगमरवरी दगडाने बांधलेले श्री हेरंब गणेश मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या मंदिराचे लोकार्पण शिवसेना विभाग प्रमुख व आमदार मंगेश कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या यावेळी गणेश भक्तांसह शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुलुंडमधील नवीन रस्त्यावर भेगा
मुलुंड (बातमीदार) ः मुलुंड पूर्व मधील साईनाथ चौक पासून बंगलारोड पर्यंतच्या रस्‍त्‍याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मात्र काही दिवसांतच या रस्त्यावर भेगा पडलेल्या दिसत आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत. दरम्‍यान याबाबत अधिक माहिती देताना महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या रस्त्यावरील भेगा लवकरात लवकर भरण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com