सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याला बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याला बळ
सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याला बळ

सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याला बळ

sakal_logo
By

तुर्भे, ता.२२(बातमीदार): तुर्भे येथील हनुमान नगरमध्ये पालिकेकडून आरोग्यवर्धिनी केंद्र उभारले जात आहे. यासाठी महापालिकेने तयारी सुरु केली असून तुर्भेतील हनुमान नगर येथील जुन्या अंगणवाडी शाळेच्या इमारतीमध्ये हे केंद्र सुरू केले जाणार आहे. यासाठी इमारतीची दुरुस्ती तसेच नूतनीकरण केले जात असून या केंद्रामुळे विभागातील गोरगरीब रुग्णांना फायदा होणार आहे.
तुर्भेमधील बहुतांश परिसर हा झोपडपट्टी आणि एमआयडीसी विभागात मोडतो. या परिसरातील नागरिकांना उपचारासाठी तुर्भे गावातील माताबाल रुग्णालयात यावे लागते. नाहीतर थेट वाशीच्या पालिका रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे नवी मुंबई महापालिका हद्दीतील सात ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कुकशेत गाव, कोपरखैरणे मध्ये तीन ठिकाणी, बेलापूरमध्ये तीन आणि दिवा किंवा रबाळे परिसरात ही आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु केली जाणार आहेत. या केंद्रामध्ये आवश्यक सर्व आरोग्य सुविधा देण्यात येणार असून रुग्णांना वेळेवर वैद्यकीय निदान होऊन उपचार घेणे सोईस्कर होणार आहे.
------------------------------------
लोकसंख्येच्या तुलनेत सुविधांचा अभाव
सध्या महापालिका हद्दीत वाशीत प्रथम संदर्भ रुग्णालय, नेरुळ, ऐरोली येथे प्रशस्त माताबाल रुग्णालय आहेत. त्याच बरोबर तुर्भे आणि ऐरोली येथेही माताबाल रुग्णालय आहेत. याशिवाय २३ ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्यात आलेली आहेत. मात्र, तरी देखील शहराची वाढती लोकसंख्या पाहता पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
--------------------------------------
साथीचे आजार रोखण्यासाठी मदत
पावसाळ्यात साथीचे आजार बळावल्यावर आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागते. मात्र, या आरोग्यवर्धिनी केंद्रामुळे स्थानिक गावठाण, झोपडपट्टी अशा भागात आरोग्य सुविधा नागरिकांना घराशेजारी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आरोग्य सुविधांचे जाळे आणखीन घट्ट होण्यास मदत होणार आहे. नागरी आरोग्य केंद्राप्रमाणेच हे आरोग्य केंद्र असणार असून त्याचप्रमाणे आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
-----------------------------------------
सध्या तुर्भे हनुमान नगर येथील बंद अंगणवाडीच्या इमारतीमध्ये हे आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु केले जाणार आहे. त्यासाठी इमारतीची डागडुजीसाठी पालिकेने निविदा मागवली असून त्यासाठी १४ लाख ५ हजार १६२ इतके पैसे खर्च केले जाणार आहेत.
- डॅा. प्रमोद पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी