पुढील स्टेशन ऐरावली ...

पुढील स्टेशन ऐरावली ...

कोमल गायकर ः सकाळ वृत्तसेवा
घणसोली, ता. २३ ः मुंबई तसेच उपनगरांमध्ये प्रवासासाठी सोयीस्कर पर्याय म्हणून रेल्वेला पसंती दिली जाते. नवी मुंबई शहरातून ठाणे तसेच मुंबईच्या दिशेने अनेक लोकल धावतात. मात्र, प्रवाशांची सोयीसाठी असलेल्या लोकलमधील इंडिकेटरवर रेल्वे स्थानकाच्या चुकीच्या उल्लेखामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
मुंबई शहराला पर्याय म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. नवी मुंबईहून मुंबई, ठाणे, पनवेलच्या दिशेने प्रवास करण्यासाठी रेल्वेची किफायतशीर सुविधा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही सेवा विविध प्रकारे विस्कळित झाल्याचे चित्र आहे. कारण लोकलमधील इंडिकेटरवर वारंवार स्थानकांची चुकीची नावे पाहायला मिळत आहेत. यात ऐरोली स्थानकाचे ऐरावली, कोपरखैरणे स्थानकाचे कोपरखायरेणा, रबाळेचे राबाडा असा उल्लेख होत असल्याने अनेकदा स्टेशनवर लावण्यात येणाऱ्या इंडिकेटरवरील चुकीची ट्रेन, चुकीची वेळ दाखवली तसेच बंद इंडिकेटर्समुळे त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत असताना आता लोकलमधून प्रवास करताना रेल्वे स्टेशनच्या नावांचा चुकीच्या उल्लेखामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम आहे.
-----------------------------------------------
प्रवाशांकडून तक्रारींचा पाऊस
- हल्ली रेल्वेच्या वेळा मागेपुढे होत असल्याने प्रवाशांची आधीच तारांबळ उडते. अशातच या मार्गावर प्रथमच प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा यामुळे गोंधळ उडत आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकारावरून रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.
- काहींनी तर मनासारख्या लोकल सोडता, चुकीच्या वेळा, चुकीचे प्लॅटफॉर्म सांगत असताना आता स्टेशनचे नावही नीट लिहिता येत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत; मात्र रेल्वे प्रशासनाला यासंदर्भात कोणतेही सोयरसूतक नसल्याचे चित्र आहे.
------------------------------------------
ठाणे ते वाशी मार्गावर प्रवास करताना इंडिकेटरवर स्थानकांचा चुकीचा उल्लेख दाखवत असल्याने संभ्रम निर्माण होतो. रेल्वे विभागाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
- निशा पाटील, प्रवासी
--------------------------------
रेल्वे स्टेशनवरील इंडिकेटरवर चुकीच्या वेळेची सवय झाली होती. आता प्रवासावेळी स्टेशनचे नाव चुकीचे दाखवले जात असल्याने हा प्रकार अतिशय वाईट आहे.
- राहुल वाघमारे, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com