अतिउत्साही पनवेलकरांना पुणेरी चिमटा

अतिउत्साही पनवेलकरांना पुणेरी चिमटा

नितीन देशमुख ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता.२३ : पनवेल म्हटले डोळ्यासमोर उभे राहते तो विस्तीर्ण असा वडाळे तलाव. या तलावाचे पालिकेने नुकतेच सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे वडाळे तलाव परिसरात सध्या विविध प्रकारच्या वन्यजीवांचा वावर वाढला आहे. पण काही अतिउत्साही लोकांकडून वडाळे तलावात खाद्य टाकले जात असल्याने पुणेरी पाट्यांमध्ये त्याचे प्रबोधन केले जात आहे.
ऐतिहासिक बल्लाळेश्वर मंदिराच्या पायाशी असणाऱ्या वडाळे तलावाचे सौंदर्य निसर्गप्रेमींना नेहमीच खुणावत असते. तलावात उमलणारी कमळे, परदेशी पक्षी, निसर्गरम्य परिसर, तलावाशेजारचा वटवृक्ष हा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे पनवेलचे भूषण असलेला विस्तीर्ण असा वडाळे तलावाचे महापालिकेने नुकतेच सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे दररोज सकाळी तसेच संध्याकाळी सध्या वडाळे तलाव परिसरात पनवेलकरांसह परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे. पण या तलावावर फिरायला येणारे नागरिक शिळे अन्न, पाव, चपाती, बिस्किटे, बर्थडेचा उरलेल्या केक, पिझ्झाचे तुकडे, कुरमुरे असे पदार्थ तळ्यातील माशांना खायला घालत असल्याने सुरक्षारक्षक तसेच काही सुजाण नागरिकांकडून त्यांना अटकाव केला जात आहे. मात्र, तरी देखील काही बेशिस्त वारंवार अन्नपदार्थ पाण्यात टाकत असल्याने तलावातील पाणी प्रदूषित होऊन माशांसाठी घातक ठरत असल्याने प्राथमिक स्वरूपात प्रबोधन करण्यासाठी पुणेरी पाट्यांच्या शैलीमध्ये कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
-------------------------------------------------
‘माशांना अरबट-चरबट खाणे’
मासे त्यांच्या संसाराची आणि पोटापाण्याची काळजी घेतात, तुम्ही आपले वडाळे तलाव स्वच्छ ठेवण्याची काळजी घ्यावी. तुमच्या अरबट-चरबट खाण्याच्या सवयी माशांना लावू नका, अशा आशयाच्या पुणेरी पाट्या पनवेलमधील सुजाण नागरिकांना लावणे भाग पडले आहे.
-----------------------------------------------------
पनवेल महापालिकेने वडाळे तलावाचे उत्तम पद्धतीने सौंदर्यीकरण केले आहे. शहरातील एक नागरिक म्हणून प्रत्येकाने या तलावाचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. या भावनेतून तलावातील माशांना खाद्यपदार्थ खायला देऊ नये, जेणेकरून तलाव स्वच्छ राहण्यास मदत होईल.
- अभिषेक पटवर्धन, पनवेलकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com