
पनवेल कोर्टाच्या निधीसाठी प्रयत्न करणार ः प्रशांत ठाकूर
पनवेल, ता.२३ (बातमीदार)ः पनवेलच्या नवीन कोर्ट इमारतीवर दोन मजले व जुन्या कोर्टाच्या जागी नवीन कोर्ट बांधण्यासाठी आर्थिक तरतुद करण्याची गरज आहे. याबाबत आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल बार कौन्सिलला दिले आहे.
पनवेल, उरण, कर्जत, खालापूर येथील दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे कामकाज पनवेल येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर आणि जिल्हा व अतिसत्र न्यायालय येथे चालत आहे. पनवेल येथे दिवाणी व फौजदारी कामाची प्रलंबित संख्या अंदाजे ४५ हजारांच्यावर आहे. या कामकाजाकरिता पनवेल येथील नवीन इमारतीमध्ये सह दिवाणी न्यायालय व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अशी सहा न्यायालये आहेत. तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर ४ आणि जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय चार आहेत. तसेच पोस्को न्यायालय एक अशी एकूण १५ न्यायालये आहेत. परंतु, नवीन कोर्टामध्ये तळमजला अधिक एक मजला असे एकूण प्रत्यक्षात आठ कक्ष असून त्यामध्ये सध्यस्थितीत दाटीवाटीने १५ न्यायालये चालवली जात आहेत. परंतु, त्यापैकी सात न्यायालयांना रीतसर कक्ष नसल्याने नवीन इमारतीमध्ये असलेली वकिलांची लायब्ररी तसेच कँटिनमध्ये आणि सिव्हिल प्रिझोनमध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे.
------------------------------
पनवेल येथील प्रलंबित कामांच्या प्रमाणात जागा उपलब्ध नसल्यामुळे कामकाजात अडचण येत आहेत. त्याकरिता शासनाकडून नवीन दोन वाढीव मजले बांधणेकरीता आर्थिक तरतूद मिळावी, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन दिले आहे.
-अॅड. मनोज भुजबळ, अध्यक्ष, पनवेल बार कौन्सिल