नाका कामगारांच्या नशिबी उपेक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाका कामगारांच्या नशिबी उपेक्षा
नाका कामगारांच्या नशिबी उपेक्षा

नाका कामगारांच्या नशिबी उपेक्षा

sakal_logo
By

जुईनगर, ता.२३ (बातमीदार) : हातावरचे पोट असणाऱ्या नाका कामगारांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. नवी मुंबई शहरातही चाळीस टक्के कामे नाका कामगारांकडून केली जातात. मात्र, दस्तावेजांअभावी असंघटीत कामगारांच्या विविध योजनांचे लाभ मिळत नसल्याने नशिबी उपेक्षिताचे जगणे आले आहे.
नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित लोकांचे वास्तव्य आहे. यात फक्त राज्यामधूनच नाही तर कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक कामाच्या शोधात स्थलांतर करतात. अशातच नवी मुंबई शहरांमध्ये बांधकाम क्षेत्रात काम मिळत असल्यामुळे हजारोच्या संख्येने नाका कामगार काम करत आहेत. यामध्ये ऐरोली, नोसील नाका, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी नाका, वाशी डेपो, नेरूळ नाका, रबाळे झोपडपट्टी, दिघा, करावे, सानपाडा, बेलापूर अशा विविध नाक्यावर प्रत्येकी तीनशे नाका कामगार कामाच्या शोधात उभे असतात. काम मिळाले तर पैसा, नाहीतर सुट्टी असा नियमच या कामगारांना लागू झाला असून दस्तावेजांअभावी असंघटित कामगारांच्या योजना लागू होत नसल्यामुळे शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून देखील वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
---------------------------------------
कामगारांसमोरील आव्हाने -
- कुटुंब तसेच स्वतःचे पोट भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे काम करण्याची तयारी त्यांची असते. त्यामुळेच सुरक्षा असो किंवा नसो काम करण्याची मानसिकतेमुळे त्यांचे आर्थिक शोषण होत आहे. अशातच महागाईसोबत कुटुंबाच्या गरजांचा वाढणारा ताणही सहन करावा लागतो.
- राज्य सरकारने या कामगारांची विभागणी केली आहे. नाका कामगार हा कामगार नाही, अशी सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका आहे. बांधकाम कल्याणकारी बोर्डामध्ये नोंदणी करायची असेल तर ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र संबंधित ठेकेदाराकडून लागते. पण नाका कामगार एकाच ठेकेदाराकडे कायमस्वरूपी काम करत नसल्यामुळे हे प्रमाणपत्र मिळणे कठीण जाते.
- स्मार्ट सिटीतील नाक्यांवर, दगड खाण, बिगारी अशा क्षेत्रातील कामगार बारा-बारा तास राबतात. असंघटित असल्यामुळे त्यांच्या या श्रमाला मोल नसते. कंत्राटदार पगार रखडवतो. वर्षानुवर्षे पगारवाढ मिळत नाही. राहण्यासाठी काहीजण पदपथांचा आसरा घेतात.
-----------------------------------------------------------
राज्य शासनाने नाका कामगारांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी असलेल्या जाचक अटी शिथिल कराव्या. या कामगारांना जागेवर वॉर्ड अधिकारी यांच्या समक्ष प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.
-प्रदीप वाघमारे शिवसेना कामगार सेना, नवी मुंबई प्रमुख
-------------------------------------------------------------
नवी मुंबईतील नाका कामगारांना निवारा शेड, त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच सामाजिक विभागाकडून त्यांना सुविधा मिळवून देण्यासाठी सकारात्मक आहोत
-डॉ. श्रीराम पवार, उपायुक्त, समाज कल्याण विभाग, महापालिका