
हरविलेला कॅमेरा मिळाला परत
ठाणे, ता. २२ : डोंबिवलीत राहणारा बीएमएमचे शिक्षण घेणारा विद्यार्थी ओंकार हा लघूपटाच्या चित्रीकरणासाठी ठाण्यात आला होता. चित्रीकरणाचे काम झाल्याने तो मित्रांसोबत रिक्षाने घरी परतत होता. ठाणे रेल्वे स्थानक येथील गावदेवी मंदिर परिसरात तो रिक्षेतून उतरला. परंतु तो कॅमेरा रिक्षातच विसरला. काही अंतर ते पुढे आले असता कॅमेरा रिक्षामध्येच राहिल्याचे त्यांना कळाले. त्यांनी रिक्षा चालकाचा शोध घेतला. परंतु तो आढळून आला नाही. त्यानंतर त्याने नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यातच घरी जात असताना पुन्हा रिक्षा चालकाचा शोध घेत असताना, परिसरातील दुकानदारांनी कोपरी वाहतूक शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार त्यांची भेट घेत, ओंकारने घडलेला प्रकार सांगितला असता, जाधव यांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून रिक्षाचा वाहन क्रमांक मिळवीत भिवंडी येथे जाऊन रिक्षा चालकाकडील कॅमेरा ताब्यात घेतला. वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या हस्ते ओंकारला कॅमेरा पुन्हा सूपूर्द करण्यात आला.