कसारा घाटातील प्रवास सुरक्षित

कसारा घाटातील प्रवास सुरक्षित

नरेश जाधव : सकाळ वृत्तसेवा
खर्डी, ता. २३ : मुंबई-आग्रा महामार्गावरील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या ठाणे-कसारा महामार्गावरील कसारा घाट ते भिवंडी दरम्यान २२ ठिकाणी ४४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामुळे महामार्गासह कसारा घाटातील प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. हे कॅमेरे लावण्याचे काम सुरू झाले असून त्याची कंट्रोल रूम खर्डी पोलिस दूरक्षेत्राच्या कार्यालयात असणार आहे. कसारा-भिवंडी दरम्यान कुठेही अनुचित प्रकार किंवा अपघात घडल्यास त्याचे चित्रण खर्डी येथे मिळणार असून खर्डी येथील कंट्रोल रूम ठाणे येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाशी जोडला जाणार आहे.
ठाणे ग्रामीण हा भाग मुंबईपासून जवळच असल्याने तडीपार झालेले अनेक गुंड या भागात आसरा घेतात. याशिवाय या भागात महामार्गाचे जाळेदेखील विस्तृत असल्याने होणाऱ्या अपघातांची संख्यादेखील मोठी आहे. अशात ठाणे-कसारा दरम्यान महामार्गावर तसेच घाटात होणाऱ्या दरोड्याचा घटना, चोऱ्या, चोरीच्या वाहनांची वाहतूक यासारखे अनेक प्रकार घडतात. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली येणार आहे. राज्याच्या गृहविभागाने महामार्गावर सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाला खर्डी येथून सुरुवात केली आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर मुंबई-आग्रा महामार्गावरील भिवंडी ते कसारा महामार्गावर होणारे अनुचित प्रकार रोखण्यासाठी मदत होणार आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास हे कॅमेरे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे ठाणे ग्रामीणचा भागात घडणाऱ्या घटनांवर पोलिसांना बारीक नजर ठेवता येणे शक्य होईल. महामार्ग पोलिस व स्थानिक पोलिसांना या सीसीटीव्हीची मदत होणार असून अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळन देता येणार आहे.
----
अशी आहे कॅमेऱ्यांची क्षमता
कसारा घाट ते भिवंडी या महामार्गावरील ८० किलोमीटरच्या आसपास ये-जा करणाऱ्या वाहनांवर २२ ठिकाणी ४४ सीसीटीव्हींची नजर असणार आहे. या सीसीटीव्हीच्या मदतीने दिवसा ५०० मीटरपर्यंतचे क्षेत्र; तर रात्री १५० मीटरच्या क्षेत्रावर लक्ष ठेवता येणार आहे.
----
मुंबई-नाशिक महामार्गावरील अपघात, अवैध वाहतूक आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी भिवंडी ते कसारा घाट दरम्यानच्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहे. यामुळे तपास कामात त्याचा फायदा होईल. तसेच अवैध धंदे करणाऱ्यावर वचक राहील.
- विकास नाईक, उपविभागीय अधिकारी, शहापूर
खर्डी : मुंबई-आग्रा महामार्गावरील खर्डी नाक्यावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
खर्डी पोलिस दूरक्षेत्रातील कंट्रोल रूम दिसत असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com