पाणीटंचाईवर जलबोगद्याचा उतारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीटंचाईवर जलबोगद्याचा उतारा
पाणीटंचाईवर जलबोगद्याचा उतारा

पाणीटंचाईवर जलबोगद्याचा उतारा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ ः सिडकोतर्फे विकास करण्यात येत असणाऱ्या नैना प्रकल्पाच्या भागाचा संपूर्ण विकासासाठी २०२७ उजाडणार आहे. त्यामुळे दक्षिण नवी मुंबईचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सिडकोने जलस्त्रोत अधिक भक्कम करण्यासाठी न्हावा-शेवा टप्पा पाणी पुरवठा योजना तीन कार्यान्वित करून जलबोगदा तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे सिडकोकडे २०२७ पर्यंत तब्बल २७० एमएलडी पाणीसाठा उपलब्ध होणार असून पाणीटंचाईवर जलबोगद्याचा उतारा फायदेशीर ठरणार आहे.
सिडको वसाहती आणि हद्दीतील शहरांची पाणीटंचाई सोडवण्यासाठी सिडकोने कोकण पाठबंधारे विभागाशी सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार सिडकोने हेटवणे धरणातून अतिरिक्त १२० एमएलडी पाणी वाटप केले जाणार आहे. त्यामुळे सिडको क्षेत्रासाठी पाण्याचा स्त्रोत २७० एमएलडीपर्यंत वाढणार आहे. सिडकोने नवी मुंबई आणि नैना क्षेत्रासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे न्हावा-शेवा टप्पा-तीन ही पाणीपुरवठा योजना वाढवण्याची सोय केली आहे. या उपक्रमामुळे २०२४-२५ पर्यंत ६९ एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. हेटवणे पाणीपुरवठा योजना १५० वरून २७० एमएलडीपर्यंत श्रेणी सुधारित करण्याची जबाबदारी मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
------------------------------------------
पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करणार
या प्रकल्पामध्ये संपूर्ण पाणी पुरवठा प्रणालीचा समवेश करण्यात आला आहे. दीर्घकालीन तांत्रिक-आर्थिक पर्याय आणि २७० एमएलडी पाणी पुरवठा करण्यासाठी हेटवणे धरण ते वहाळ या जलवाहिनीवर जलकुंभ आणि पाण्याचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. हा प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण होण्याचा अंदाज सिडकोतर्फे वर्तवण्यात येत आहे.
------------------------------
प्रक्रियाकृत पाण्याचा वापर
- तळोजा एमआयडीसीमधील कारखान्यांना वापरासाठी सिडकोकडून प्रक्रियाकृत पाणी पुरवठा करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सिडकोतर्फे कळंबोली येथे ५० एमएलडी क्षमता आणि खारघर येथे ७० एमएलडी क्षमता असणारे दोन केंद्र उभारण्यात येणार आहेत. सध्याच्या एसटीपीमधून प्रक्रिया केलेले पाणी देण्याची योजना आखली आहे.
- पहिल्या टप्प्यात सिडकोने तळोजा एमआयडीसी परिसरातील उद्योगांना २० एमएलडी प्रक्रिया केलेले पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव केला आहे. सिडकोने गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क आणि सिडको गृहनिर्माण प्रकल्पांसाठी प्रक्रियाकृत पाण्याचा वापर केला आहे. याव्यतिरिक्त, टाटा हॉस्पिटल आणि जिओ इन्स्टिट्यूट एनएमएसईझेड, उलवे यांनाही प्रक्रियाकृत पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
-----------------------------
या गावांना होणार फायदा
नैना प्रकल्पातील वसाहतींसाठी पाण्याचे नियोजन केले जात आहे. या नियोजनामुळे पनवेल तालुक्यातील नैना प्रकल्पात मोडणाऱ्या गावांना फायदा होणार आहे. या गावांमध्ये सिडकोतर्फे पाणी पुरवठा होणार आहे.
़ः-----------------------------------
जल बोगद्यावरील प्रस्तावित खर्च
- हेटवणे ते जीते गावापर्यंत ९०० कोटी
- जीते ते साई गावापर्यंत ७०० कोटी
- साई ते विंधणे गावापर्यंत ४९५ कोटी