
ट्रान्सफॉर्मर चोरताना रंगेहाथ पकडले
वाडा, ता. २३ (बातमीदार) : तालुक्यातील कुडूस येथील एका इमारतीखाली ठेवलेले ट्रान्सफॉर्मर चोरताना तीन चोरांना नागरिकांनी रंगेहाथ पकडल्याची घटना सोमवारी (ता. २२) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सचिन पष्टे हे नयनरम्य अपार्टमेंटमध्ये राहत असून ते विद्युत कंत्राटदार आहेत. त्यांनी इमारती खाली दोन ट्रान्सफॉर्मर ठेवले होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास सचिन यांचा मित्र स्वप्नील याने फोन करून, इमारतीखाली ट्रान्सफॉर्मर काही व्यक्ती चोरी करत आहेत. तू लवकर ये, असे फोनवर सांगितले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत इमारतीखाली जाऊन पाहिले असता त्या दोघांनी तीन चोरांना पकडले. संशयित आरोपी गणेश कुमार (वय १८), अंशु शर्मा (१७), गोलु यादव (१६) यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तर अंधाराचा फायदा घेऊन अन्य दोन चोर पळून गेले. या प्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार आर. एम. गवळी करत आहेत.