प्रीमियर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीमियर
प्रीमियर

प्रीमियर

sakal_logo
By

हिंदी चित्रपट -
सिर्फ एक बंदा काफी है

दमदार व खिळवून ठेवणारा कोर्ट ड्रामा

संतोष भिंगार्डे
आपल्या देशात अनेक साधू-संत होऊन गेलेले आहेत. लोकांनी त्यांच्यावर विश्वास आणि श्रद्धा ठेवली आहे. त्यांना देवासमान मानून त्यांची पूजाअर्चाही केली. आजही असेच साधू-संत-बाबा आहेत. कित्येकांची त्यांच्यावर अपार श्रद्धा आणि विश्वास असल्याने त्यांची पूजा केली जाते. अलीकडच्या काळात मात्र काही लोकांचा बाबांवरील विश्वास उडू लागला आहे. त्याला कारण ठरलेले आहे त्या बाबांची दृश्यकृते. अशाच एका बाबाच्या दृश्‍यकृत्याची कहाणी ''सिर्फ एक बंदा काफी है'' या चित्रपटामध्ये मांडण्यात आली आहे.
हा बाबा आपल्या एका भक्तावर म्हणजे एका अल्पवयीन मुलीवर गैरवर्तन करतो. मग ती मुलगी आणि तिचे आई-वडील त्या बाबाच्या विरोधात कसे खंबीरपणे उभे राहतात. त्यामध्ये त्यांना पी. सी. सोलंकी नावाच्या वकिलाची कशी मदत होते, याचे विदारक चित्रण या चित्रपटात आहे. कथेला सुरुवात होते ती अल्पवयीन मुलगी नूर (आद्रिजा शर्मा) आणि तिचे आई व वडील दिल्लीतील कमल नगर पोलीस ठाण्यात जातात येथून. तेथे ते त्या बाबावर नूरबरोबर गैरवर्तन केल्याचा गुन्हा दाखल करतात. पोलिस त्या बाबांना अटक करतात. साहजिकच बाबांवर अपार श्रद्धा असलेली भक्तमंडळी संप्तत होतात. त्यांचाच वकील पैसे घेऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतो. ती बाब त्या पीडित मुलीच्या आई-बाबांना कळताच ते पोलिसांच्या मदतीने पी. सी. सोलंकी नावाच्या वकिलाची मदत घेतात. सोलंकी हा वकील प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असतो. तो त्या मुलीला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. दरम्यानच्या कालावधीत त्या बाबाचा कर्मचारी वर्ग त्यांना सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मग त्यामध्ये ते यशस्वी होतात का? त्या मुलीला न्याय मिळतो का? तिचा वकील पी. सी. सोलंकी न्यायालयात तिची बाजू कशी मांडतो? वगैरे प्रश्नांच्या उत्तरासाठी हा चित्रपट पाहावा लागेल.
या चित्रपटाची कथा सत्य घटनेवरून प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे. लेखक दीपक किंगराणी यांनी उत्तम पटकथा बांधली आहे आणि त्याला साजेसे दिग्दर्शन अपूर्व सिंग कार्की यांनी केले आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा आणि खिळवून ठेवणारा असा हा कोर्ट ड्रामा आहे. न्यायालय आणि तेथील एकूणच कामकाज दिग्दर्शकाने छान पद्धतीने मांडलेले आहे. अभिनेता मनोज वाजपेयीने अॅड. पी. सी. सोलंकी यांची व्यक्तिरेखा सुंदररीत्या साकारली आहे. त्यांच्या भूमिकेतील बारकावे मनोजने पडद्यावर छान मांडलेले आहेत. एक वकील म्हणून न्यायालयात अशिलाची बाजू मांडत असतानाच दुसरीकडे आपला मुलगा हरवल्याचे कळताच पिता म्हणून त्यांची होणारी घालमेल हे पडद्यावर उत्तमरित्या रेखाटले आहेत. विशेष म्हणजे क्लायमॅक्समधील त्यांचे संभाषण अक्षरशः थक्क करणारे झाले आहे. त्याचबरोबर विपीन शर्मा, प्रियांका सेठिया, अजय सोनी, निखिल पांडे आदी कलाकारांनी आपापली बाजू चोख बजावली आहे.
चित्रपटात दोन गाणी आहेत आणि ती छान जमलेली आहेत. चित्रपटाला चांगल्या पटकथेची जोड मिळालेली आहे; तसेच संवादही खणखणीत व लक्षवेधक आहेत. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी अर्जुन कुकरेती यांनी उत्तम केली आहे. मात्र, सुरुवातीला चित्रपट काहीसा संथ झाला आहे. न्यायालयातील काही दृश्ये लांबलेली आहेत. तरीही दमदार, प्रभावशाली आणि खिळवून ठेवणारा असा हा कोर्ट ड्रामा आहे. हा चित्रपट झी ५ ओटीटी ॲपवर प्रदर्शित झाला आहे.

साडेतीन स्टार