
पर्सनल लोनच्या नावाने फसवणूक
अंधेरी, ता. २४ (बातमीदार) ः ऑनलाईन पर्सनल लोनच्या नावाने एका ४४ वर्षांच्या व्यक्तीची सुमारे एक लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आफरीन आरिफ खत्री या महिलेस गोरेगाव पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत तिच्यासोबत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
तक्रारदार गोरेगाव येथे राहत असून त्याचा डीटीपी ऑपरेटर म्हणून स्वतःचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे तो ऑनलाईन कर्जासाठी शोध घेत होता. ३० नोव्हेंबरला त्याला सुमीतकुमार नावाच्या एका व्यक्तीने फोन करून त्याला कर्जाची आवश्यकता आहे का, याबाबत विचारणा केली. त्याने होकार दिल्यानंतर सुमीतकुमारने त्याला कर्जासाठी इन्कम टॅक्स, आरटीजीएसटी आणि प्रोसेसिंग फीसाठी काही रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याने त्याच्या बँक खात्यात नोव्हेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सुमारे एक लाख रुपये पाठवून दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्याला कर्ज मिळवून दिले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने गोरेगाव पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्याच्या तक्रार अर्जावरून पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. ही शोधमोहीम सुरू असतानाच या गुन्ह्यांत आफरीन खत्री हिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत तिचा सहभाग उघडकीस येताच तिला नंतर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात ती सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याने पोलिसांनी सांगितले.