
इमारतीवरुन पडून कामगाराचा मृत्यू
अंधेरी, ता. २४ (बातमीदार) ः खार येथील एका निवासी इमारतीमध्ये काम करताना इमारतीवरून पडून तफसीर अहमद नुरुलहुदा चौधरी या कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी जैन इसाया नाडर या कंत्राटदाराविरुद्ध खार पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही घटना सोमवारी (ता. २२) सकाळी खार येथील नर्गीस दत्त रोड, पदमसी अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक बी तीनमध्ये घडली. वडाळा येथे राहणारा तन्वीर अहमद चौधरी हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो एम. एच. ॲल्युमिनियम या कंपनीत सुपरवायझर; तर त्याचा भाऊ तफसीर हा जैन नाडर या कंत्राटदाराकडे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. सोमवारी तो त्याचा नातेवाईक फैजन चौधरीसोबत खार येथील एका इमारतीमध्ये इलेक्ट्रिशियनचे काम करण्यासाठी गेला होता. सकाळी साडेदहा वाजता काम करताना तफसीर हा मोकळ्या खिडकीतून तोल गेल्याने खाली पडला होता. त्याला तातडीने भाभा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. कंत्राटदार असलेल्या जैन नाडरने त्याच्याकडील कामगाराच्या सुरक्षेसाठी कुठलीही सुरक्षा साधनांचा उपयोग केला नव्हता. त्याच्या हलगर्जीपणामुळे तफसीरचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तन्वीरच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी कंत्राटदार जैन नाडरविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.