दृष्‍टीक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दृष्‍टीक्षेप
दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

sakal_logo
By

‘राज्यात धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न’
मालाड (बातमीदार) ः येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात जाणीवपूर्वक धार्मिक विद्वेष व तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही छुप्या शक्ती करीत असल्याचा आरोप जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षा साजिदा निहाल अहमद व प्रधान महासचिव प्रताप होगाडे यांनी केला आहे. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्रातही विविध निवडणुकांचे वेध लागले आहेत. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. तसेच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकाही फार लांब राहिलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्यात धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर काही छुप्या शक्ती करीत असल्याचे दिसत असल्‍याचे त्‍यांनी या वेळी सांगितले. त्र्यंबकेश्वर येथील घटना असो किंवा शेवगाव, अकोला, औरंगाबाद, अमरावती आदी ठिकाणी घडलेल्या घटना असोत, त्यामध्ये निश्चित असे सूत्र असल्याचे दिसत आहे, असा आरोप या दोघांनी केला आहे. राज्यात जातीय दंगे घडणार, अशी सुप्त चर्चा होत आहे. किंबहुना प्रमुख राजकीय नेत्यांनी याबाबत सूतोवाच केले आहे. त्यामुळेच याला वेळीच आळा घालण्याची आवश्यकता आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रसंगी कठोर प्रशासनाची भूमिका घेऊन संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाई करावी आणि सर्व समाज घटकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण करावी, अशी अपेक्षा साजिदा अहमद व प्रताप होगाडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

‘इनड्राइव्ह’ची प्रवाशांसाठी विशेष मोहीम
घाटकोपर (बातमीदार) ः इनड्राइव्ह या संकल्पनेतून मुंबईसह देशभरातील लोकांना परवडणाऱ्या किमतीत प्रवास करण्याची सुविधा मिळत आहे. मुंबईत प्रवासी आणि चालकांना आपापसात रास्त भाड्यांबाबत वाटाघाटी करण्याची परवानगी देऊन राइड-शेअरिंग उद्योगात क्रांती घडवून आणली आहे. इनड्राइव्हने ‘तुम्ही दोघेही सहमत असलेल्या वाजवी किमतीत प्रवास करा’ ही नवीन मोहीम सुरू केली आहे. नुकत्‍याच झालेल्‍या पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. या वेळी इनड्राइव्हचे अविक कर्माकर, सर्गेई कोंड्रुत्स्की, मोहन प्रधान, पवित्र नंदा आनंद, जितेंद्र पगारे आदींसह चालक आणि प्रवासी उपस्थित होते. या वेळी मुंबईत ‘ड्रायव्हर ऑफ द मंथ’ सुरू करण्याची घोषणा केली.

स्वच्छतागृहाची अखेर स्वच्छता
धारावी (बातमीदार) : मध्य रेल्वेवरील सायन रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवरील पुरुष स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली होती. त्यामुळे प्रवाशांना त्याचा वापर करणे अशक्य झाले होते. तसेच यामुळे येथील फलाटावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. याकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी प्रवासी करत होते. याची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने स्वच्छतागृहाची सफाई व दुरुस्ती केली आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. रेल्‍वे स्थानक व्यवस्थापक अशोक संकपाळ यांनी लक्ष घालून तातडीने दुरुस्ती केल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.

‘जिजाऊ’च्या विद्यार्थ्यांची भाभा केंद्रात निवड
घाटकोपर (बातमीदार) ः जिजाऊ संस्थेच्या वतीने मोफत चालवण्यात येत असलेल्या अकॅडमी तसेच वाचनालयाच्या सुविधेचा लाभ घेऊन शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील संदेश देसले या विद्यार्थ्याची भाभा परमाणू अनुसंधान केंद्रात असिस्टंट या पदासाठी निवड झाली आहे. याबद्दल त्याचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ठाणे, पालघर कोकणातल्या विविध दुर्गम भागांत जिजाऊ संस्थेच्या वतीने एकूण ४३ वाचनालये चालवली जातात. संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे हे २००८ पासून आपल्या संस्थेच्या माध्यमातून हे काम करत आहेत. संस्थेच्या मोफत अकॅडमीचा, वाचनालयाचा लाभ घेऊन आज पाचशेहून अधिक अधिकारी घडले आहेत.