
स्थलांतरित मजूर घरी परतले
विक्रमगड, ता. २४ (बातमीदार) : विक्रमगड शहरासह परिसरात शेती हंगामाचे चार महिने सोडले, तर रोजगार देणारा कोणताही मोठा उद्योग नाही. त्यामुळे पावसाळी शेती हंगाम संपताच गाव-पाड्यांवरील आदिवासी कुटुंबे कामाच्या शोधात शहरांच्या ठिकाणी स्थलांतरित होतात. आता पावसाळी शेती हंगाम जवळ आल्याने जिल्ह्यातील मजूर वर्ग शहराच्या ठिकाणाहून त्यांच्या गावी परतताना दिसत आहेत. या काळात ते चार महिने घरची शेती करण्यासाठी येतात. मे अखेरपर्यंत सर्वच स्थलांतरित कुटुंबे गावी परतणार आहेत.
जून महिन्याच्या मध्यावधीपासून मान्सूनला सुरुवात होते. सध्या शेतीपूर्व मशागत, राबणीसाठी लागणाऱ्या शेती अवजारांची दुरुस्ती, डागडुजीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतकरी सुताराकडे बसून अवजारांची दुरुस्ती करून घेताना दिसत आहे. सद्यःस्थितीत शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होऊन अत्याधुनिकतेचे प्रमाण वाढले आहे. परिस्थितीत बदल होत असला तरी अनेकांनी सुतारकाम व्यवसाय परंपरेनुसार जोपासला आहे, असे चित्र सध्यातरी विक्रमगड व ग्रामीण भागात पाहावयास मिळते.
आधुनिक युगातही नांगरांना मागणी
सध्या शेतीमध्ये नवनवीन बदल झालेले दिसून येत आहेत. आज अनेक जण प्रामुख्याने ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची कामे करताना दिसतो. मात्र तालुक्याच्या ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात बैल, नांगरांचा वापर होताना दिसतो.
पावसाळ्यापूर्वी पूर्वतयारीला वेग
मे अखेरपर्यंत शेतीच्या मशागतीची कामे करताना आदिवासी शेतकरी दिसतो. पोटासाठी बाहेरगावी स्थलांतरित झालेले कुटुंब पावसाळ्याच्या अगोदरच पूर्वतयारीसाठी घरी परततात. शेतीमध्ये राबणी करून शेतीची सुपिकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.
घराची डागडुजी
पावसाळ्यात घराला गळती लागू नये, याकरिता कौले चाळून घेतली जातात, अथवा जुनी कौले बदलून नवीन बसवली जातात. त्यावर भात-पेंढा टाकला जातो. घरासमोर पाघळीचे पाणी आत येऊ नये, करिता छोटीशी पडवी बांधली जाते. पावसाळ्यासाठी घराची डागडुजी करून चार महिने पुरेल, असे साहित्य साठवून ठेवले जाते.
पावसाळी शेतीची कामे संपल्याने जिल्ह्यात रोजगाराची संधी नसल्याने शहरात जावे लागते. पावसाच्या आगमनासाठी काही दिवसच शिल्लक असल्याने मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी लवकर यावे लागते. जिल्ह्यात रोजगार उपलब्ध झाल्यास स्थलांतराची वेळ येणार नाही.
- दिनेश पवार, मजूर