एमआयडीसीत राजकारण्यांची चमकूगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयडीसीत राजकारण्यांची चमकूगिरी
एमआयडीसीत राजकारण्यांची चमकूगिरी

एमआयडीसीत राजकारण्यांची चमकूगिरी

sakal_logo
By

वाशी, ता. २४ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये पालिकेकडून होर्डिंग लावण्यासाठी नियमावली आहे. त्यानुसार कुठेही जाहिरात फलक लावण्यासाठी पालिकेची परवानगी बंधनकारक आहे. मात्र, एमआयडीसीमध्ये राजकीय नेत्यांकडून फलकबाजीचा सुळसुळाट सुरू असून पालिकेने लाखो रुपयांच्या महसुलावरही पाणी सोडले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीमध्ये राजकीय नेत्यांकडून फलकबाजी करताना परवानगी घेण्यात येते. त्यामुळे पालिकेला महसूल मिळतो. मात्र, एमआयडीसी पट्ट्यातील झोपडपट्टी परिसरांमध्ये मतदारांचे लक्ष्य वेधण्यासाठी विनापरवानगी राजकीय जाहिरातबाजी होत आहे. एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांवरील रबाळे, तुर्भे, गवते वाडी, विष्णुनगर, यादव नगर या ठिकाणी हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. मात्र, असे असताना एमआयडीसी पट्ट्यातील जाहिरात फलकांमुळे पालिकेकडून याकडे कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे एमआयडीसीमधील होर्डिंगवर पालिकेकडून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात अतिक्रमण उपआयुक्त सोमनाथ पोटारे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
------------------------
स्वयंघोषित नेते आघाडीवर
पालिकेच्या येणाऱ्या आगामी निवडणुका बघता इच्छुक उमेदवार, तसेच स्वयंघोषित राजकीय नेते हे फलकबाजीतून चमकण्याचा प्रयत्न करत आहेत. एमआयडीसीतील झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्त्यावर, तसेच एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यांवर फुकटात प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न होत आहे. तसेच अतिक्रमण पथकांकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे चौकांचे विद्रुपीकरण झाले आहे.