
डेपोच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याचे ढीग
जुईनगर, ता. २४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने विभागातील कचराकुंड्या हटवल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर कचरा टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. सारसोळे बस डेपोच्या प्रवेशद्वारासमोर अशाच प्रकारे कचरा टाकण्यात येत असल्यामुळे ढिगामुळे परिसराला बकालपणा आला आहे. पालिकेने कुंडीमुक्त शहर करण्याचा निर्णय घेतला आहे. पण काही सुशिक्षित नागरिक रस्ते, पदपथ, बस डेपोचे प्रवेशद्वार, उद्यानातील गेट समोरील दिसेल तिथे कचरा फेकत असल्याने कचरा संकलनाच्या संकल्पनेलाच हरताळ फासला गेला आहे. सारसोळे डेपोच्या प्रवेशद्वारावर सध्या कचऱ्याचे ढीग लागले आहेत. त्यामुळे एकीकडे रंगरंगोटीने शहर सजवले जात असताना दुसरीकडे डेपोच्या बाहेर कचऱ्याचे ढीग लागले असल्याने प्रवाशांच्या नाकीनऊ आले आहेत.
------------------------------
बस डेपोच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याचा ढीग साचला आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा.
- सुदर्शन पाले, प्रवासी