Tue, October 3, 2023

अर्नाळा किल्ल्यावर शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा
अर्नाळा किल्ल्यावर शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा
Published on : 25 May 2023, 10:04 am
विरार, ता. २५ (बातमीदार) : अर्नाळा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अर्नाळा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. मनोहर वैती यांच्या शिल्पकलेतून साकारत असलेल्या या पुतळ्याची शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी किल्ल्यात असलेल्या आई एकविरा देवीचे दर्शन घेतले. या किल्ला भेटीप्रसंगी त्यांचे सहकारी राजन पाटील, महेश म्हात्रे आणि शाखाप्रमुख किशोर तांडेल उपस्थित होते.