प्रीमियर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीमियर
प्रीमियर

प्रीमियर

sakal_logo
By

रिताभरी बनली बंगाली चित्रपटसृष्टीतील ट्रेंडसेटर
रिताभरी चक्रवर्ती ही बंगाली अभिनेत्री सातत्याने महिलांवर लक्ष केंद्रित करणारे प्रोजेक्ट्स करत आहे. चित्रपटांमध्ये लिंग प्रतिनिधित्व हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. रिताभरी कायमच सशक्त स्त्री पात्रे साकारून प्रेक्षकांकडून पसंती मिळवते. तिच्या प्रवासाबद्दल रिताभरी म्हणाली, ‘माझा सिनेमाच्या परिवर्तनीय शक्तीवर विश्वास आहे. महिलांना सशक्त करणाऱ्या कथा समोर आणण्याचा प्रयत्न असतो. ‘ब्रह्मा जनेन गोपन कोम्मोट’सारख्या प्रकल्पांचा भाग बनणे हा एक सन्मान आहे जे प्रेक्षकांना गुंजतात आणि संभाषणांना प्रोत्साहन देतात’. तिचा या आधीचा चित्रपट, ‘ब्रह्मा जानेन गोपन कोम्मोट’ हा धार्मिक संदर्भात स्त्रियांच्या जीवन आणि संघर्षांबाबत आहे. जो त्यांच्या प्रगतीचे कथन करतो. रिताभरीचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘फटाफाटी’ हासुद्धा सध्या सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्याच्या मार्गावर आहे. ‘ब्रह्मा जनेन गोपन कोम्मोट’च्या मागे असलेल्या टीमनेच ‘फटाफटी’ हा चित्रपट तयार केला आहे. ज्यात दिग्दर्शक अरित्रा मुखर्जी, लेखक झिनिया सेन आणि निर्माता जोडी शिबोप्रसाद मुखर्जी आणि नंदिता रॉय यांचा समावेश आहे. रिताभरीची अर्थपूर्ण कथाकथनाच्या बांधिलकीमुळे बंगाली चित्रपटसृष्टीतील ती सकारात्मक बदलासाठी एक खरी ट्रेंडसेटर बनली आहे.
...................

आईला समर्पित ‘ती एकटी चांदणी’
प्रख्यात गायक, संगीतकार आणि उद्योजक जशन भूमकर याने आईबद्दलचे ऋण व्यक्त करण्यासाठी ‘ती एकटी चांदणी’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित केले आहे. हे भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी गाणे मुलांना त्यांच्या आईबद्दल वाटणाऱ्या प्रेमाला मूर्त रूप देते. या गाण्यातून विस्तीर्ण आकाशात आणि संपूर्ण विश्वात आई हीच मुलासाठी एकमेव चमकणारा तारा आहे, अशी सुंदर भावना व्यक्त केली आहे. या गाण्याबद्दल जशन म्हणाला, ‘ती एकटी चांदणी’ हे गाणे जगातील सर्व सुंदर मातांना आणि मातेसमान व्यक्तिमत्त्वांना आदरांजली आहे. संपूर्ण विश्वात आपल्यावर नि:स्वार्थ प्रेम करणारी एखादी व्यक्ती असेल, तर ती म्हणजे आपली माता. आपण आपल्या आयुष्यात कितीही मोठे झालो आणि यशाचे शिखर गाठलो, तरी आपल्या आईने जे केले त्याची परतफेड आपण कधीच करू शकत नाही. मला माझी आई प्रियंवदा भूमकर यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली. ज्यांनी एक उद्योजक आणि आई अशा दोन्ही भूमिका समर्थपणे पार पाडलेल्या आहेत. आईने मला एक चांगले व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. हे गाणे म्हणजे तिच्याबद्दलच्या कौतुकाचा एक छोटासा प्रयत्न आहे. मला खात्री आहे, या गाण्यातून व्यक्त झालेली भावना श्रोत्यांच्या मनाला नक्की भिडेल’. ‘ती एकटी चांदणी’ हे गाणे जशन भूमकरने लिहून गायले आहे. जगदीश भांगडे आणि मितेश चिंदरकर यांनी संगीत दिले आहे.
..................
‘असुर सीझन २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
कोरोनाकाळात ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘असुर’ या वेबसीरिजची चांगलीच चर्चा रंगली होती. सुरुवातीला या सीरिजला प्रतिसाद कमी होता; पण नंतर ही ती प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली. सायको थ्रिलर पठडीत मोडणारी ही कथा कुठल्याच सीरीजमध्ये पाहिली नव्हती. तेव्हापासून या सीरिजच्या पुढच्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अर्शद वारसी आणि बरुण सोबती या दोन्ही अभिनेत्यांच्या कामाची प्रचंड प्रशंसा झाली. आता मात्र ही प्रतीक्षा संपली आहे. कारण लवकरच ‘असुर’चा सीझन २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘असुर’चा पहिला सीझन ‘वूट’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. आता याचा पुढील सीझन मात्र ‘जिओ सिनेमा’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. जिओने एका व्हिडीओमधून येणाऱ्या बऱ्याच वेबसीरिज आणि चित्रपटांबद्दल माहिती दिली. त्‍यात ‘असुर २’चा देखील समावेश आहे. या व्हिडीओमध्ये ‘असुर’च्या दुसऱ्या सीझनची काही झलक पाहायला मिळाली आहे; पण अद्याप त्‍याचा टीझर किंवा ट्रेलर प्रदर्शित झालेला नाही. दुसरा सीझन जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. अर्शद वारसीनेही याबद्दल भाष्य करताना तो या नव्या सीझनमधील नवीन आव्हानांसाठी प्रचंड उत्सुक असल्याचे सांगितले होते. या वेबसीरिजमध्ये अर्शद वारसी, वरुण सोबती, रिद्धी डोग्रा, आणि अनुप्रिया गोएंका हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

‘घुसपैठ’ बोस्टन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये
अभिनेता अमित साध याने वेबसीरिज आणि चित्रपटांमध्ये काही उत्तम भूमिका साकारल्या आहेत. प्रभावशाली अभिनयाने प्रेक्षकांची
मनेही जिंकली आहेत. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘घुसपैठ’ या लघुपटातील त्याच्या आकर्षक अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. नुकतेच बोस्टन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘घुसपैठ’ दाखवण्यात आला. त्याबद्दल अमित साध म्हणाला, ‘मी या प्रकल्पाचा एक भाग झालो, याचा खूप आनंद आहे. जेव्हा मिहिरने मला चित्रपटासाठी विचारले, तेव्हा त्याची माझ्यासोबत काम करण्याची असलेली तयारी आणि उत्साहाने माझे मन जिंकले. म्हणूनच मी ‘घुसपैठ’ला हो म्हणालो. पहिला दिग्दर्शकीय उपक्रम म्हणून त्याने उत्कृष्ट काम केले आहे. आम्ही हा चित्रपट दानिश सिद्दीकीसारख्या फोटो पत्रकारांना समर्पित केला आहे. ज्यांनी त्यांच्या कामाने सगळ्यांची मने जिंकली आणि समाजाचे एक वास्तव दाखवले’. सध्या अमित साधकडे या वर्षात अनेक उत्तमोत्तम प्रोजेक्ट्स आहेत. मेन, पुणे हायवे, दुरंगा २ असे काही मनोरंजक प्रकल्प आहेत. त्यापैकी काही या वर्षात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये चित्रीकरणाला येणार वेग
भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये एकेकाळी बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. यश चोप्रा यांच्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण जम्मू-काश्मीरमध्ये झाले आहे. तेथील निसर्ग सौंदर्याने कायमच हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांना भुरळ घातली आहे. अतिरेकी कारवाया वाढल्यामुळे तेथील चित्रीकरण थंड पडले होते. जम्मू-काश्मीरमध्ये चित्रीकरण करण्यासाठी कोणीही धजावत नव्हते. नुकतीच भारताच्या जी२० अध्यक्षतेखाली जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटन कार्य गटाची बैठक झाली. या बैठकीत जम्मू-कश्मीरमधील चित्रपट पर्यटनाला कार्यचालना देण्याचे ठरले. या बैठकीसाठी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी आणि जी२० शेर्पा अमिताभ कांत उपस्थित होते. संमेलनाच्या पहिल्या दिवशी चित्रपट, पर्यटनाला चालना देणारा ‘एक साइड इव्हेंट’ झाला. या वेळी ‘इंडिया अॅज अ फिल्म टुरिझम डेस्टिनेशन’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. पॅनेल चर्चेत स्पेन, सिंगापूर, मॉरिशस, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि भारताचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात ग्रीन टुरिझम, डिजिटायझेशन, स्किलिंग, टुरिझम एमएसएमई आणि डेस्टिनेशन या पाच प्रमुख प्राधान्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

.............
नीना गुप्ताचे ४० डिग्रीमध्ये शूट
नीना गुप्ता सध्या त्यांची आगामी वेबसीरिज ‘पंचायत ३’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. नीना यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या कडक भर उन्हात शूटिंग करताना दिसत आहेत. त्यांनी गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. नीना गुप्ता सांगतात, ‘तापमान ४० डिग्री आहे. खूप गरम होत आहे. छत्री डोक्यावरून निघून गेली की असे वाटते सर्व काही जळून गेले आहे. मी मुंबईत आले, तर मला कोणी ओळखणार नाही. पण काहीही असो, अभिनय तर करावाच लागतो’. हा व्हिडीओ शेअर करत नीना यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘एक ॲक्टर की धूप कथा’. नीना यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते त्यांची जोरदार प्रशंसा करत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना चाहत्याने लिहिले, ‘मॅडम आम्हा सर्वांना तुम्ही खूप आवडतात... आमच्यासाठी एवढे करा’. प्रत्येक जण ‘पंचायत ३’ची वाट पाहत आहे. आणखी एका यूजरने लिहिले, ‘वाह पंचायतची शूटिंग सुरू. आता जास्त वेळ वाट पाहू शकणार नाही’. तर तिसऱ्याने ‘लव्ह यू निनाजी’ असे लिहिले.