
भिवंडीत रस्त्यासाठी एमआयएमचे उपोषण
भिवंडी, ता. २४ (बातमीदार) : शहरातील भिवंडी पूर्व विधानसभा आमदार निधीतून मौजे खान कम्पाऊंड अलफलक शाळेजवळ बनविलेल्या आरसीसी रोड आणि गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी एमआयएमचे कार्याध्यक्ष शादाब उस्मानी यांनी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती क्र.२ मधील मौजे खान कम्पाऊंड अलफलक शाळेजवळ बनविलेल्या आरसीसी रोडच्या कामाचे कार्यारंभ आदेश मे. मुंब्रादेवी इंटरप्राइजेस यांना देण्यात आले होते. या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला तडे पडल्याने व हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने आरसीसी रोड आणि गटारांच्या कामाचे ऑडिट करून संबंधितांवर कारवाईची मागणी उस्मानी यांनी केली होती. मात्र पालिकेच्या बांधकाम विभागाने ठेकेदारावर कारवाई केली नाही, असा आरोप करीत उस्मानी यांनी मंगळवारपासून महापालिका मुख्य कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
.....
ठेकेदाराला नोटिसा
पालिकेचे शहर अभियंता सुनील घुगे यांनी सदर कामांतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्यावर तडे पडल्याने त्याची दुरुस्ती करण्याबाबत व गुणवत्तेप्रमाणे बनवून देण्याबाबत ठेकेदारास दोन नोटिसा बजावल्याची माहिती दिली. तसेच हा रस्ता दुरुस्ती केल्याखेरीज महापालिकेकडून ठेकेदाराला कोणतेही देयक दिले जाणार नाही, असे कळविले आहे.