
अंबरनाथमध्ये ज्येष्ठांचा सन्मान
अंबरनाथ, ता. २४ (बातमीदार) : वयाची ७५ वर्ष पूर्ण झालेल्या त्याचप्रमाणे लग्नाला ५० वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांचा सत्कार किणीकर विकास प्रतिष्ठान व ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नुकताच करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या उपस्थितीमध्ये पूर्व विभागातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा तसेच वयाची शंभर वर्षे पूर्ण केलेल्या मधुसूदन गोखले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यात जीवन जगत असताना ज्येष्ठांचे मार्गदर्शन हे नेहमी पथ दर्शक ठरत असून या वयात ही जेष्ठ नागरिकांचा उत्साह पाहून ऊर्जा मिळते, असे सांगून आमदार डॉ. किणीकर यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. वडवली विभागातील रोटरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी मराठी व हिंदी गाणी सादर करत आपली कला देखील सादर केली. लग्नाला ५० वर्षे पूर्ण झालेल्या पाच जोडप्यांचा तर ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ४५ ज्येष्ठांचा यावेळी सन्मान करण्यात आला.