वाहतूक कोंडीसह रस्ते कामांमुळे एसटीला भुर्दंड

वाहतूक कोंडीसह रस्ते कामांमुळे एसटीला भुर्दंड

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : कोरोना आणि कामगारांनी पुकारलेल्या अचानक संपामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) अक्षरशः कंबरडे मोडले. त्यातच राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासात दिलेल्या सवलतीमुळे प्रवासीसंख्या वाढली आहे. यामुळे एसटी मार्गावर येत असताना, ऐन उन्हाळी सुट्यांमध्ये ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने शहरी भागात वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या तसेच पुलांच्या कामांमुळे प्रतिदिनी पाच लाख १० हजार रुपयांचा नाहक भुर्दंड ठाणे विभागाला सहन करावा लागतात. यामुळे गेल्या २० दिवसांत एसटीच्या ठाणे विभागाला एक कोटींच्या उत्पन्नावर निव्वळ पाणी सोडवावे लागले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य शासनाने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक मोफत प्रवासाची; तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना आणि सर्व महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत जाहीर केली. यामुळे एसटीची लालपरी सुसाट सुरू आहे. मात्र, एकीकडे उन्हाळी सुट्या जाहीर झाल्यानंतर एसटी विभागाने जादा गाड्यांचे नियोजन सुरू केले आहे. त्यातच १ ते १४ मेदरम्यान ठाणे जिल्ह्यातून लांब, मध्यम आणि शहरी भागात धावणाऱ्या लालपरीतून ७ लाख ३८ हजार ४४८ महिला; तर एक लाख ४३ हजार ३२ ज्येष्ठांनी प्रवास केला आहे. पावसाळ्यापूर्वी केलेली जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाने त्यातच मेट्रो आणि उड्डाणपुलांच्या कामांबरोबर ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, बोरिवली-भाईंदर आदी परिसरात वाहतूक कोंडीकडे डोके वर काढले आहे. त्याचा कळत-नकळत परिणाम एसटी विभागाला बसत आहे.
......
दररोज १३ हजार किमीचा प्रवास रद्द
वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या कामांमुळे दररोज सरासरी १३ हजार किलोमीटरचा प्रवास एसटीचा रद्द होऊ लागला आहे. यामुळे इंधनाचीही नासाडी होऊन नुकसान होत आहे. दररोजच्या सरासरीचा विचार केल्यास गेल्या २० दिवसांत एसटीच्या ठाणे विभागाला अंदाजे २ लाख ६० हजार किलोमीटर प्रवास रद्द करण्याची वेळ ओढवली आहे.
......
कामे वेळीच पूर्ण करा
रस्त्यांची कामे अशी सुरू राहिल्यास नुकसान होऊन एसटीचे पुन्हा एकदा कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कामे हाती घेणाऱ्या त्या- त्या प्रशासनाने आपापली कामे वेळीच मार्गी लावावी आणि एसटीचे कसे नुकसान कमी होईल, याचाही विचार करावा, अशी मागणी एसटी महामंडळाकडून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com