उत्पादन शुल्क विभागाचा दोषसिद्धी निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्पादन शुल्क विभागाचा दोषसिद्धी निकाल
उत्पादन शुल्क विभागाचा दोषसिद्धी निकाल

उत्पादन शुल्क विभागाचा दोषसिद्धी निकाल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : ठाणे जिल्ह्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्ट्या, परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक यांच्याविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत असते. या कारवाईदरम्यान मुद्देमालासह अनेक आरोपींनादेखील अटक करण्यात येत असते. काही दाखल गुन्ह्यांची प्रकरणे राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने राष्ट्रीय लोकन्यायालयात आयोजित विशेष शिबिरात दाखल केली होती. यामधील ५३ गुन्ह्यांचा निकाल देत, ५५ आरोपींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आरोपींनी गुन्हा कबूल केल्यामुळे न्यायालयाने दोषसिद्धी निकाल देत, आरोपीला प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावत दोषसिद्धी प्रमाणित केली आहे. उत्पादन शुल्क विभागाचा अशा प्रकारचा निकाल प्रथमच लोकन्यायालयात देण्यात आला आहे.
अवैध मद्यविक्री, निर्मिती त्याचबरोबर दुसऱ्या राज्यातील मद्यास मजाव करण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग सतर्क असतो. काही वेळा गुन्हेगारांना पकडताना विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतते; मात्र मोठ्या कौशल्याने विभागाचे कर्मचारी गुन्हेगारांना जेरबंद करतात. ठाणे जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभाग भरीव कामगिरी करत असताना, विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात प्रथमच गुन्हे दाखल केले होते. यामध्ये ५३ गुन्ह्यांत न्यायालयाने दोषसिद्धी (कन्वेक्शन) निकाल देत ५५ आरोपींना दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती ठाणे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. नीलेश सांगडे यांनी दिली. लोकन्यायालयात दोषसिद्धी निकालात गुन्हेगाराला प्रत्येकी २५ हजाराचा दंड ठोठावला आहे. जमा झालेल्या दंडाची रक्कम १४ लाख २५ असून, दोषसिद्धी उपक्रमातून जास्तीत जास्त गुन्हे निकाली काढण्याचा प्रयत्न उत्पादन शुल्क विभागाचा आहे.

..........................................
महाराष्ट्रात दारूबंदी नियम १९४९ अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धी उपक्रमाचे प्रमाण वाढवले, तर आरोपींवर जरब राहील. शासनाच्या महसुलात वाढ होईल. अवैध मद्यविक्री, निर्मिती, वाहतुकीला आळा बसण्यास मदत होईल. राज्यात अशा मोठ्या प्रकारची कारवाई कधीच झाली नव्हती. त्यामुळे ‘दोषसिद्धी ठाणे पॅटर्न’ सर्व राज्यात उत्पादन शुल्क विभाग राबवणार आहे.
- डॉ. नीलेश सांगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाणे