
पथदिव्यांचे १२ कोटींचे वीजबिल थकबाकी
मनोर, ता. २४ (बातमीदार) : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांच्या वीजबिलाच्या थकीत रकमेचा भरणा करण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासन आणि राज्य सरकारकडून कार्यवाही होत नाही. पथदिव्यांची जोडणी असलेल्या ६८६ ग्रामपंचायतींकडे जून २०२२ पासून १२ कोटी रुपयांची वीजबिलाची रक्कम थकीत आहे. त्यामुळे सोमवारपासून (ता. २२) पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. आता विजेअभावी ग्रामपंचायती अंधारात जाणार आहेत.
महावितरण कंपनीने पथदिव्यांच्या वीजबिलाच्या थकबाकीमधील व्याजाची रक्कम कमी करून २,२३७ कोटी रुपयांच्या रकमेचा पुरवणी मागणी प्रस्ताव २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला होता. २०२२-२३ च्या वित्तीय वर्षासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीतून २,३३७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. महावितरणला दिलेल्या रकमेचे जिल्हा परिषदांनी दिलेल्या तपशिलाप्रमाणे ग्रामपंचायतींच्या दिवाबत्तीच्या वीज देयकाच्या थकबाकीत समायोजन करण्यात आले होते. पालघर मंडळातील ग्रामपंचायतींच्या थकीत २१ कोटी रुपयांच्या वीजबिलापैकी दहा कोटी रुपये प्राप्त झाले होते.
महावितरणच्या पालघर मंडळातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांच्या ६८६ ग्रामपंचायतींना वीजजोडण्या आहेत. पथदिव्यांच्या जून २०२२ पासून मे २०२३ पर्यंतच्या चालू वीजबिलाची रक्कम १९ लाख ४० हजार आहे; तर थकीत रक्कम एक कोटी सहा लाख रुपये मिळून सव्वा कोटी रुपयांच्या घरात आहे. यात दहा कोटी ९५ लाख रुपयांची व्याजाची थकीत रक्कम धरून १२ कोटी २१ लाख रुपयांची थकबाकी ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांच्या वीजबिलाची आहे.
ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांच्या वीजबिलाची रक्कम सरकार स्तरावरून भरली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
- चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर जिल्हा परिषद
पथदिव्यांच्या वीजबिलाबाबत स्पष्ट निर्देश प्राप्त झाले नाहीत. वर्षभरापासून बिलाची रक्कम थकीत असल्याने मागणी करूनही भरणा होत नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
- अशोक ढाकणे, व्यवस्थापक, महावितरण पालघर