साधू वासवानी उद्यानाच्या बचावासाठी रहिवासी एकवटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साधू वासवानी उद्यानाच्या बचावासाठी रहिवासी एकवटले
साधू वासवानी उद्यानाच्या बचावासाठी रहिवासी एकवटले

साधू वासवानी उद्यानाच्या बचावासाठी रहिवासी एकवटले

sakal_logo
By

साधू वासवानी उद्यानाच्या बचावासाठी रहिवासी एकवटले
एमएमआरडीएविरोधात शनिवारी आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : एस. व्ही. रोडवरील टाटा ब्लॉक्समधील रहिवासी आणि वरदे मार्ग रहिवासी संघटनेचे सदस्य एकत्रित येऊन शनिवारी (ता. २७) मेट्रो दोन बी कॉरिडॉरच्या परिसरातील साधू वासवानी उद्यान वाचविण्यासाठी एमएमआरडीएविरोधात आंदोलन करणार आहेत. एमएमआरडीएच्या स्थानकात केलेल्या बदलाच्या निर्णयावर रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रहिवाशांनी या वेळी स्थानिक आमदार आशीष शेलार यांच्यावरही नाराजी व्यक्त केली. रहिवासी सांगतात की, ‘वासवानी गार्डन येथे झालेल्या एका सभेत, आशीष शेलार यांनी मतदारसंघातील नागरिकांना आश्वासन दिले की, एसव्ही रोड या अत्यंत गर्दीच्या ठिकाणी टाटा ब्लॉक्सच्या बाहेर मेट्रो स्टेशन बांधले जाणार नाही. म्हणून आमची चिंता संपली होती. खरे तर शेलार यांनी एमएमआरडीएच्या चुकीच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल नागरिकांचे आभारही मानले होते. पुढे, शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही संपर्क साधला, त्यांनीही हे प्रकरण एमएमआरडीएशी बोलून सोडवण्याचे आश्वासन दिले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरही, एमआरडीएने त्यांची भूमिका बदलली नाही, असे नागरिक सांगतात.

काय आहे समस्‍या?
रहिवाशांच्या मते, मेट्रो दोन बी कॉरिडॉरच्या मूळ योजनेत वांद्रे पश्चिमेतील दोन स्थानके समाविष्ट आहेत. यात लकी रेस्टॉरंट सिग्नलजवळील वांद्रे आणि पश्चिम रेल्वे कर्मचारी कॉलनीसमोरील जीवन किरण बंगल्याजवळील नॅशनल कॉलेज या स्‍थानकांचा समावेश आहे. नॅशनल कॉलेज स्‍थानक हे ग्रेस गॅलेक्सी हॉटेलपासून सुरू होऊन वांद्रे येथील एसव्ही रोडवरील मारुती ऑटो व्हिस्टा शोरूमपर्यंत, टाटा ब्लॉक्स पारसी कॉलनीच्या विरुद्ध दिशेने मागे विस्तारलेले आहे. या मार्गात येणाऱ्या साधू वासवानी उद्यानातील अनेक झाडे कापण्यात येणार आहे, असा रहिवाशांचा दावा आहे.

स्‍थानिकांचे आवाहन
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसह सर्व राजकीय पक्षांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी तसेच एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांच्या मागणीला कमी लेखू नये, असे म्हणत असतानाच उद्यान वाचविण्यासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन स्थानिकांनी केले आहे.

मेट्रो दोन बी कॉरिडॉरचा परिणाम फक्त जवळच्या परिसरावर होणार नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण वांद्रे परिसरावर होईल. आमदार आशीष शेलार आणि माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी नागरिकांना नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि वरदे मार्ग रहिवासी संघटनेच्या सदस्यांना विश्वास आहे, की ते आमच्या हितासाठी आवश्यक ते सर्व काही करतील.
- जमीर पालमकोटे, सहअध्यक्ष, वरदे मार्ग रहिवासी संघटना