
पोलिस निरीक्षक बनले सहायक पोलिस आयुक्त
नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : राज्याच्या गृह विभागाने पोलिस निरीक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पोलिस उपअधीक्षक/सहायक पोलिस आयुक्त (निःशस्त्र) या पदावर पदोन्नती देत मंगळवारी त्यांची यादी जाहीर केली आहे. यात नवी मुंबई पोलिस दलातील सात पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांची मुंबई व रायगड पोलिस दलात पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. या बदल्याप्रमाणेच गृह विभागाने नवी मुंबई पोलिस दलातील दोन सहायक पोलिस आयुक्तांची मुंबई पोलिस दलात सर्वसाधारण बदली केली आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिस दलातील चार सहायक पोलिस आयुक्तांच्या नवी मुंबईमध्ये सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत.
यामध्ये नवी मुंबई पोलिस दलातील खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश गावडे, मोरा सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभिजीत मोहिते, तसेच सागरी सुरक्षा शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत धरणे व महाराष्ट्र दहशतवातविरोधी पथक नवी मुंबई युनिटचे (एटीएस) वरिष्ठ पोलिस निरीक्षक अधिकराव पोळ या चौघांची पदोन्नतीने मुंबई पोलिस दलात सहायक पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष कोकाटे यांची खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारीपदी, तसेच नवी मुंबई वाहतूक प्रशासन शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश रामचंद्र चव्हाण यांची मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच पनवेल महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलिस उपअधीक्षक संदीप भागडीकर यांचीसुद्धा मुंबईच्या सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे.
---------------------
तिघे उपअधीक्षकपदी
नवी मुंबई कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे वाचक पोलिस उपअधीक्षक शिवाजी पडतरे यांची पेण विभागीय पोलिस अधिकारीपदी, तसेच पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले नवी मुंबईतील पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार व रत्नागिरी येथील पोलिस निरीक्षक विनितकुमार चौधरी या दोघांची नवी मुंबईत पोलिस उपअधीक्षक डायल ११२ येथे पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे.