धारदार शस्त्राने वार करुन एकाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारदार शस्त्राने वार करुन एकाचा खून
धारदार शस्त्राने वार करुन एकाचा खून

धारदार शस्त्राने वार करुन एकाचा खून

sakal_logo
By

पनवेल, ता. २४ (वार्ताहर) : धारदार शस्त्राने वार करून एकाची हत्या करून त्याचा मृतदेह नवीन पनवेल उड्डाण पुलाखालील रेल्वे पटरीजवळ असलेल्या वाहत्या नाल्यात टाकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी मृतदेह नाल्यात सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
बुधवारी सकाळी नवीन पनवेल उड्डाण पुलाखालील रेल्वे पटरीजवळ असलेल्या वाहत्या नाल्यामध्ये एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती खांदेश्वर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तेथील नाल्यातून मृतदेह बाहेर काढला. मृत व्यक्तीच्या कपाळावर डाव्या डोळ्याच्या बाजूस, उजव्या हाताच्या दंडावर व पार्श्वभागावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याचे आढळून आले. मृत व्यक्तीची ओळख पटू नये यासाठी त्याचे सर्व कपडे काढून त्याचा मृतदेह नवीन पनवेल येथील उड्डाण पुलाखालील नाल्यात टाकून दिला होता.

--------------------
ओळख पटवण्यासाठी आवाहन
या घटनेतील मृत व्यक्ती अंदाजे ४५ ते ५० वयोगटातील असून तो रंगाने सावळा व अंगाने मजबूत आहे. मृताची उंची १७४ सेंमी असून त्याच्या पायात काळे सॉक्स आहेत. मृत व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी खांदेश्वर पोलिस ठाण्याच्या दूरध्वनी क्रं. ०२२-२७४६५३३८ किंवा महिला पोलिस निरीक्षक गलांडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.