एसी लोकलमध्ये फुकट्यांची गर्दी

एसी लोकलमध्ये फुकट्यांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : उन्हाच्या चटक्यापासून बचावासाठी फुकट्या प्रवाशांनी आता एसी लोकलकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे एसी लोकलचा पासधारकांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे कार्यालयाने एसी लोकलमध्ये तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांत ७९८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून ३१ मेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे.
मुंबईत दमट हवामान असते. त्यात उन्हाळा आला की, लोकलचा प्रवास नकोसा वाटतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी मुंबईतील एसी लोकलकडे धाव घेतात. या कालावधीत एसी लोकलच्या प्रवाशांची संख्यासुद्धा वाढते. मात्र त्याचबरोबर उन्हापासून बचावासाठी फुकटेसुद्धा एसी लोकलमध्ये शिरकाव करतात. त्यांची संख्यासुद्धा उन्हाळ्यात सगळ्यात जास्त असल्याचे निदर्शनात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या एसी लोकलमध्ये गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवासी मोठ्या संख्येने लोकलमध्ये प्रवास करत असल्याच्या तक्रारी वातानुकूलित तिकीट-पासधारकांच्या वाढत असल्याने मध्य रेल्वेकडून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. एसी लोकलमध्ये १९ मेपासून तपासणी मोहीम सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी २५७ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. २२ मेअखेर एकूण ७९८ विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. सकाळी ७ ते रात्री ११ या कालावधीतील रोज ४५ लोकल फेऱ्यांमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. रेल्वे तिकीट तपासनिसांसह रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी असे एकूण १६ कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
...
एसी लोकलच्या ५६ फेऱ्या
मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी होण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर एसी लोकल चालवण्यात येतात. मध्य रेल्वेवर सध्या दिवसाला एसी लोकलच्या ५६ फेऱ्या चालवण्यात येतात. या फेऱ्या सीएसएमटी-ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळादरम्यान धावतात. दररोज ५० हजारांपेक्षा जास्त प्रवासी या एसी लोकलमधून प्रवास करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com