
दोन देशी पिस्तूलसह १० जिवंत काडतुसे जप्त
उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) : दोन देशी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह दोघांना अटक केल्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली. आसिफ नसीर शेख (वय २४), तौफीक हसन शेख (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. उल्हासनगर दूधनाका ते जुने एसटी स्टॅण्डदरम्यान मुकेश वॉईन्ससमोर दोन इसम अवैधरित्या देशी पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांना मिळाली होती. या अनुषंगाने राजेंद्र अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संपत फडोळ, उपनिरीक्षक कैलास इंगळे, संदीप खाडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक रमेश केजळे, शाम रसाळ, पोलिस हवालदार उज्ज्वला मर्चर्डे, चंद्रकांत सावंत, ज्ञानेश्वर महाजन, मधुकर माळी, शेखर भावेकर, चंद्रकांत पाटील, गणेश गावडे, सतीष सपकाळे, संयज शेरमाळे, राजेंद्र थोरवे, नीलेश अहिरे, अर्जुन मुत्तलगिरी यांनी सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत आरोपींकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल व १० जिवंत काडतुसे ताब्यात घेण्यात आली. आरोपी हे छत्रपती संभाजी नगरातील रांजनगाव शेणपुंजी, एमआयडीसीमधील असून त्यांचा ताबा हिललाईन पोलिसांकडे देण्यात आल्याचे राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.