
अमेरिकी भीतीने भारतात पडझड
मुंबई, ता. २४ ः अमेरिकी व्याजदरवाढीच्या भीतीने आज भारतीय शेअरबाजारात पडझड झाली व तीन दिवसांची तेजी संपुष्टात आली. आज सेन्सेक्स २०८.०१ अंश; तर निफ्टी ६२.६० अंशांनी घसरला.
अमेरिकेत व्याजदरवाढीची भीती पुन्हा उफाळून आल्याने तेथे मंगळवारी रात्री पडझड झाली. त्यामुळे सेन्सेक्स व निफ्टी सकाळी तोटा दाखवीतच उघडले; मात्र ती संधी साधून तेजीवाल्यांनी मोठी खरेदी केल्यामुळे सेन्सेक्स ६२ हजारांवर गेला. दुपारी युरोपीय शेअरबाजारही तोटा दाखवीत उघडल्याने भारतीय शेअरबाजारही पुन्हा घसरले. दिवसअखेर सेन्सेक्स ६१,७७३.७८ अंशांवर; तर निफ्टी १८,२८५.४० अंशांवर स्थिरावला.
निफ्टीच्या प्रमुख ५० पैकी ३०; तर सेन्सेक्सच्या मुख्य ३० पैकी १६ शेअर तेजीत होते. सेन्सेक्समधील सनफार्मा दोन टक्के तर आयटीसी, इंडसइंड बँक, टायटन, टेक महिंद्र, मारुती या शेअरचे भाव एक टक्का वाढले; तर टाटा मोटर, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह या शेअरचे भाव एक ते दीड टक्का घसरले.