
मविआच्या प्रस्तावाची आंबेडकरांना प्रतीक्षा
मुंबई, ता. २४ ः लोकसभेच्या निवडणुकीची जागावाटप चर्चा महाविकास आघाडीत सुरू झाली असताना भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना मात्र अद्याप चर्चेचा किंवा जागांचा प्रस्ताव मिळालेला नाही.
मुंबईतून प्रकाश आंबेडकर यांना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांच्यासमोर लोकसभेच्या रिंगणात दाखल केले जाणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे; मात्र या सर्व चर्चा ऐकतो आहे, असे त्यांनी सांगितले. गेली कित्येक वर्षे प्रतिनिधित्व करत असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघातूनच लोकसभा निवडणूक लढण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केला. ही आपली शेवटची निवडणूक असेल, पुन्हा मतदारांना कौल मागण्यास ते जनतेत जाणार नाहीत, असे बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या निकटवर्तीयांना सांगितल्याचे समजते. मुंबई महानगरपालिकेतील जागावाटपासंबंधी शिवसेना ठाकरे गटाशी चर्चा झाली होती. त्यानंतर मविआने संपर्क साधलेला नाही. भाजपविरोधात आघाडी उभारण्यात सर्व समविचारी पक्षांना बोलावले जाईल, अशी आशा कायम असल्याचेही पक्षातून सांगण्यात आले. यासंदर्भात अन्य कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता अद्याप मविआचे चर्चेसाठी बोलावणे आले नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.