
काळा काचा लावणाऱ्यांकडून १३ लाखांची दंडवसुली
ठाणे, ता. २४ (वार्ताहर) : ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकवण्यासोबतच वाहनांवर काळ्या काचा लावणाऱ्यांवर वाहतूक विभागाने चांगलाच चाप लावला आहे. ठाणे वाहतूक शाखेने धडक कारवाई करीत जानेवारी ते १६ मे २०२३ या कालावधीत वाहतूक विभागाने चक्क १७८५ वाहनांवर कारवाई केली असून १३ लाख ४५ हजार ५०० रुपयांच्या दंडाची वसुली केल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिली.
वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे, तसेच नियम मोडणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहित हाती घेत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ही कारवाई सुरू असतानच वाहनांच्या काचेवर काळा फिल्म लावणाऱ्यांवर आता पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. अशा वाहनांवर दंडात्मक कारवाईचा पोलिसांनी धडाका सुरू केला. यामध्ये ठाणे शहर वाहतूक विभागाने २०२१ या वर्षात दहा हजार ६२७ तर सन २०२२ या वर्षात ९५०२ वाहनांवर काळ्याकाच्या लावल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करीत ८८ लाख १७ हजार रुपयांची वसुली केली आहे; तर गेल्या पाच महिन्यांत १७८५ वाहनचालकांकडून १३ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
.....
दंडात्मक कारवाई
ठाणे वाहतूक शाखेच्या या धडक कारवाईने काळ्या काचा लावून फिरणाऱ्या वाहनचालकांमध्ये धडकी बसली होती. वाहनांना काळ्या काचा लावून त्याच्या आडोशाला अनेक गैरकृत्य केली जात असल्याच्या कारणास्तव ठाणे वाहतूक शाखेने वाहनांवर काळ्या काचा लावण्यास प्रतिबंध केला असतानाही काही जण गाड्यांवर काळ्या काचा लावून फिरताना दिसतात. त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाईची मोहीम मागील दोन वर्षांपासून सातत्याने सुरू ठेवली आहे.
....
चारचाकी वाहनांना काळ्या काचा लावून फिरणाऱ्या चालकांवर ठाणे वाहतूक विभागाच्या वतीने मोटर वाहन कायदा कलम १७७ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते. यात दंडाची रक्कम ५०० रुपये एवढी असून जर एकदा दंड झालेला वाहनचालक वारंवार नियमांचे उल्लंघन करीत असेल, तर अशा वाहनचालकाकडून दीड हजार रुपयांचा दंड आकारण्यात येतो. काळ्या काचा या विशेष व्यक्तींकरिता लावण्याची मुभा असून इतर वाहनांनी काळ्या काचा लावू नयेत; अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे वाहतूक विभाग
....
वर्ष - केसेस - दंडवसुली
२०२१ -१०,६२७ -२२,०२,७००
२०२२- ९,५६२ - ६६,१५,५००
जाने ते मे २,०२३ - १७८५ - १३,४५,५००
एकूण - २१,९७४ - १,०१,६३,७००