
ढगाळ वातावरणामुळे उष्णतेत वाढ
जव्हार, ता. २५ (बातमीदार) : हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे तापमानात घट होईल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली होती; परंतु तालुक्यातील वातावरण ढगाळ झाल्यानंतर उष्णता वाढली. त्यामुळे घामाच्या धारांनी नागरिक बेजार झाले आहेत. त्यातच अनेकदा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत असते. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना आता वरुणराजाच्या बरसण्याची आस लागली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून तालुक्यातील कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत; मात्र उन्हाचा चटका कायम असल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. आता ढगाळ वातावरणाने तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने आगामी काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच गुरुवारी (ता. २५) तापमानाचा पारा ३९ अंश सेल्सिअसवर पोहचला होता. वाढत्या तापमानामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.