इलेक्ट्रिक बसची प्रवाशांना प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इलेक्ट्रिक बसची प्रवाशांना प्रतीक्षा
इलेक्ट्रिक बसची प्रवाशांना प्रतीक्षा

इलेक्ट्रिक बसची प्रवाशांना प्रतीक्षा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २५ : खासगी बसकडे धाव घेणाऱ्या प्रवाशांना आकर्षिक करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या ‘शिवाई’ बस दाखल झाल्या आहेत; मात्र, यातील एकही बस रायगडकरांच्या वाट्याला अद्याप आलेली नाही. चार्जिग स्टेशनचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा अशा अनेक कारणांमुळे येथील प्रवाशांना किमान तीन वर्षे तरी अलिशान बसची वाट पाहावी लागणार आहे.
डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचा खर्च कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस चालवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काही जिल्ह्यांमध्ये या इलेक्ट्रिक बसगाड्या दाखलही झाल्या; परंतु रायगड जिल्ह्यातून अशा बसगाड्या मिळाव्यात, यासाठी प्रस्तावच पाठवण्यात आलेला नाही. येथील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी परिवहन महामंडळाला आणखी काही वर्षे घालवावी लागणार आहेत.
जिल्‍ह्यात एसटी विभागाचे एकूण आठ आगार असून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. मात्र बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था झाली आहे. अत्‍याधुनिक सोयी-सुविधा देण्यापूर्वी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलण्याचे शिवधनुष्य परिवहन महामंडळाला उचलावे लागणार आहे. अलिबाग-पनवेल हा रायगड जिल्ह्यातील सर्वात व्यस्त मार्ग आहे. या मार्गावरून दिवसाला हजारो नागरिक प्रवास करतात. किमान या मार्गावर तरी इलेक्ट्रिक बस सुरू होतील, अशी अपेक्षा येथील प्रवाशांना होती. मात्र, परिवहन महामंडळाच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत.
रायगडमधील खराब रस्त्यांमुळे नादुरुस्त होणाऱ्या बसचे प्रमाण जास्त आहे. दुर्गम भाग, बसेसची अनियमितता यामुळे दिवसेंदिवस लालगाडीने प्रवास करणाऱ्यांची संख्या रोडावत आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाने विविध उपाययोजना सुरू केले असून ज्‍येष्‍ठांना मोफत प्रवास, महिला सन्मान योजनेचा त्‍यात सहभाग आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रिक बसही सुरू करण्यात आल्‍या असून ‘शिवाई’ नावाने धावणाऱ्या बसची रागयडकरांना प्रतीक्षा आहे.

बसची संख्या निम्‍म्‍यावर
गतवर्षी नादुरुस्त बस मोठ्या संख्येने सेवेतून बाद करण्यात आल्‍या आहेत. तीन वर्षांपूर्वी ८०० च्या आसपास असलेली संख्या आता ४०० वर आली आहे. खराब रस्त्यामुळे बस लवकर खराब होत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. बाद होणाऱ्या बसच्या बदल्यात नव्या बसे येत नसल्याने जिल्ह्यातील अनेक मार्गावरील बस बंद करण्यात आल्‍या आहेत. बसचा तुटवडा भरून काढण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात २४ नव्या बसेस दाखल झाल्या आहेत; परंतु प्रवासी आणि मार्गांच्या तुलनेत त्‍यांची संख्याही अपुरीच आहे.


परिवहन महामंडळाची स्थिती
प्रकार / २०१९-२०/२०२०-२१/२०२१-२२/२०२२-२३
मार्गाची संख्या / ८०९/५१०/१८१/१९०
बसची संख्या / ७००/५९७/५८९/४११
सरासरी प्रवासी (लाखांत)/ १.९८/०.५६/०.५६/०.६८

इलेक्ट्रिक बसगाड्या सुरू करण्यासंदर्भात सध्या तरी कोणत्याही हालचाली नाहीत किंवा त्याप्रकारच्या सूचना वरिष्ठ कार्यालयातून आलेल्या नाहीत. इलेक्ट्रिक बस चार्जिंग करण्यासाठी बसचा प्रवास सुरू होणाऱ्या आगारामध्ये आणि शेवटच्या स्थानकात चार्जिंग सेंटर असावे लागते. रायगडमध्ये अशा बस सुरू करण्यासाठी सर्वात आधी चार्जिंग सेंटर सुरू करावे लागतील.
- दीपक घोडे, विभागीय वाहतूक नियंत्रक, रामवाडी