
शासकीय योजनांच्या शिबिराला ठाणेकरांचा प्रतिसाद
ठाणे, ता. २५ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यामुळे भाजपतर्फे ‘मोदी@९’ या कार्यक्रमांतर्गत ठाणे शहरात १५ ठिकाणी शासकीय योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पहिल्याच दिवशी ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात ठाणे शहरातील विविध भागात राहणाऱ्या नागरिकांनी केंद्रीय व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती घेण्याबरोबरच लाभ घेतला. चार दिवस सुरू राहणाऱ्या या शिबिराचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केले आहे.
ठाणे शहर भाजपाच्या वतीने सुरू झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन विष्णूनगर येथील महापालिकेच्या शाळेत झाले. आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी दीप प्रज्वलित शिबिराचे उद्घाटन केले. पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी, पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना (पेन्शन योजना), दीनदयाळ अंत्योदय योजना (स्वयंरोजगार कार्यक्रम), पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री ई-श्रम योजना, बचत गट नोंदणी आणि सवलतीत कर्जपुरवठा आदी योजनांसह राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ शिबिरात दिला जात आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी कागदपत्रे घेऊन गर्दी केली होती. ठाण्यातील गरजू नागरिकांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी भाजपाला महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, अग्रणी बँकेने सहकार्य केले आहे.