
हद्दपार गुंडाला खंडणीविरोधी पथकाद्वारे अटक
ठाणे, ता. २५ (वार्ताहर) : ठाण्याच्या वागले इस्टेट परिसरात वास्तव्य करणाऱ्या आणि स्थानिक पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपी सचिन विनय शर्मा (वय २०) याला दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते. पोलिस उपआयुक्त परिमंडळ ५ यांनी ही कारवाई केली होती. तरीही पोलिसांना गुंगारा देत सचिन शर्मा हा ठाण्यातच वास्तव्य करत होता. अखेर ठाणे खंडणीविरोधी पथकाने आरोपी सचिन शर्मा याला बुधवारी (ता. २४ ) दुपारी ३ वाजता अटक केली. आरोपी सचिन शर्मा हा वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम येथे वास्तव्यास आहे. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिस उपआयुक्त परिमंडळ-५ यांनी २७ मार्च २०२२ रोजी दोन वर्षांकरिता ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर व नवी मुंबई या जिल्ह्यांच्या महसूल हद्दीतून हद्दपार केलेले होते. मात्र पोलिसांचा मनाई आदेश झुगारून आरोपी शर्मा हा अंबिका नगर परिसरात वावरताना ठाणे खंडणीविरोधी पथकाला आढळला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात मनाई आदेश धुडकावला. प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.